Prahar’s resounding victory in Chandur Bazar Municipal Council : चांदूर बाजार नगरपालिकेत मनीषा नांगलिया यांचा दणदणीत विजय
Amravati चांदूर बाजार नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाने मोठा राजकीय धक्का देत पालिकेवर आपला वरचष्मा प्रस्थापित केला आहे. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत प्रहारच्या उमेदवार मनीषा मनीष नांगलिया यांनी भाजपच्या कांता उबन अहिर यांचा तब्बल ७३५ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला.
मनीषा नांगलिया यांना एकूण ५,००१ मते मिळाली, तर भाजपच्या कांता उबन अहिर यांना ४,२६६ मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला. या निकालामुळे चांदूर बाजारच्या राजकारणात मोठा बदल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
नगरपालिका सदस्यांच्या निकालातही प्रहार जनशक्ती पक्षाने आपली ताकद दाखवून दिली आहे. एकूण २० नगरसेवकांपैकी १३ जागांवर प्रहारने विजय मिळवला आहे. उर्वरित जागांमध्ये भाजपला केवळ २ जागा, २ अपक्ष, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना प्रत्येकी १ जागा मिळाली आहे.
Local Body Elections : बदललेल्या राजकीय समीकरणाचा भाजपला फायदा
या निकालामुळे नगरपालिकेत सत्तास्थापनाबाबत कोणतीही अनिश्चितता न राहता प्रहार जनशक्ती पक्षाची स्पष्ट बहुमताची सत्ता स्थापन होणार असल्याचे निश्चित झाले आहे. प्रहारने मतदारांचा विश्वास संपादन करत एकतर्फी वर्चस्व निर्माण केले. निकाल जाहीर होताच प्रहारच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत, ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला.
Local Body Elections : महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला अभूतपूर्व यश
पालिकेत पहिल्यांदाच पती–पत्नीची एकसाथ एन्ट्री
चांदूर बाजार नगरपालिकेत प्रहारच्या उमेदवार मनीषा मनीष नांगलिया या नगराध्यक्षपदी निवडून आल्या असून, त्यांचे पती मनीष नांगलिया हे प्रभाग क्रमांक ९ मधून नगरसेवक म्हणून विजयी झाले आहेत. त्यामुळे पालिकेत पहिल्यांदाच पती–पत्नीची एकसाथ एन्ट्री झाल्याची चर्चा आहे.
मतदारांचे ऋण व्यक्त करत विकासाचा शब्द
चांदूर बाजारच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक व जनहिताचे काम करण्याची जबाबदारी मतदारांनी आमच्यावर सोपवली आहे. या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही नगराध्यक्ष मनीषा नांगलिया यांनी दिली.








