Bacchu kadu urges cm devendra fadnavis for government medical college in Achalpur : अचलपूरला हलविण्याची केली विनंती, पत्राद्वारे मेळघाटातील मृत्युदराकडे वेधले लक्ष
Amravati एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा दोन दिवसांपूर्वी देणाऱ्या बच्चू कडूंनी मुख्यमंत्र्यांना आता पत्र लिहीले आहे. या पत्रात त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अचलपूरला हलविण्याची विनंती केली आहे. अमरावतीमध्ये प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेच्या वादामुळे रखडले असताना ते अचलपूर येथे स्थानांतरित करावे, अशी मागणी बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मेळघाटातील वाढत्या मृत्यूदरावर नियंत्रण आणण्यासाठी अचलपूर हा अधिक योग्य पर्याय ठरेल, असे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात कडू यांनी अमरावती व अचलपूर येथील आरोग्य सुविधांची तुलनात्मक आकडेवारी सादर केली आहे. अमरावती शहरात जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन), डफरीन, सुपर स्पेशालिटी तसेच अनेक खासगी व निमशासकीय वैद्यकीय महाविद्यालये कार्यरत असून एकूण बेड क्षमता सुमारे ३,५०० पेक्षा अधिक आहे. याउलट अचलपूर तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय आणि ट्रॉमा केअर मिळून केवळ १५० ते २०० बेडचीच सुविधा उपलब्ध आहे.
मेळघाट, धारणी आणि चिखलदरा या अतिदुर्गम भागातील रुग्णांना गंभीर उपचारांसाठी १५० ते २०० किलोमीटरचा प्रवास करून अमरावती गाठावे लागते. या प्रवासात चार ते पाच तास खर्ची पडत असल्याने वेळेवर उपचार न मिळाल्याने बालमृत्यू, मातामृत्यू आणि कुपोषणाचे प्रमाण वाढत असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.
मेळघाटाशी जवळीक असल्याने आदिवासी बांधवांना तातडीने उपचार मिळतील, अमरावतीतील आरोग्य सुविधांवरील ताण कमी होईल आणि ग्रामीण भागात आरोग्य सेवांचे संतुलित वितरण साधता येईल. तसेच वेळेवर उपचार मिळाल्यास दुर्गम भागातील मृत्यूदरात घट होण्यास मदत होईल, असा दावा कडू यांनी केला.
अमरावतीत आधीच सात ते आठ वैद्यकीय महाविद्यालये कार्यरत असताना नवीन महाविद्यालय पुन्हा तेथेच उभारणे तर्कसंगत नसल्याचे सांगत, आदिवासी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी हा प्रकल्प अचलपूरला वळवावा, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.








