New question marks due to State Election Commission decisions : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयांमुळे नवे प्रश्नचिन्ह
Mumbai : मुंबई महापालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयांमुळे वाद निर्माण झाला असून आयोगाचा अजब कारभार पुन्हा चर्चेत आला आहे. PADU मशीनच्या निर्णयानंतर आता मतदानाच्या ऐनवेळी मतदान केंद्राच्या आत माध्यम प्रतिनिधींना प्रवेश नाकारण्यात आल्याने गंभीर सवाल उपस्थित होत आहेत.
मुंबईतील मतदान केंद्रांमध्ये अधिकृत प्रवेशिका असतानाही माध्यम प्रतिनिधींना आत प्रवेश देण्यात येत नसल्याचे चित्र आहे. राज्य निवडणूक आयोगाने केवळ मतदान केंद्राबाहेरील रांगेचे चित्रीकरण करण्यास परवानगी दिली असून प्रत्यक्ष मतदान केंद्राच्या आत कोणत्याही प्रकारचे वार्तांकन करण्यास मनाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुंबई वगळता राज्यातील इतर महापालिकांमध्ये माध्यम प्रतिनिधींना अशी कोणतीही अडवणूक केली जात नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे केवळ मुंबईसाठीच वेगळी भूमिका का, असा प्रश्न उपस्थित होत असून निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Municipal Election: बटण दाबूनही लाईट लागेना, मतदान केंद्रावर गोंधळ
याआधी राज्य निवडणूक आयोगाने PADU नावाचे नवीन मशीन निवडणूक प्रक्रियेत आणल्याने वाद उफाळून आला. प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट असे PADU मशीनचे पूर्ण नाव असून ईव्हीएम बंद पडल्यास हे मशीन वापरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, ईव्हीएमला पूरक स्वरूपात नवीन मशीन जोडण्याबाबत आधी कोणतीही माहिती दिली नव्हती, असा आरोप करण्यात आला. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी या मुद्द्यावर थेट सवाल उपस्थित करत निवडणूक आयोगाने आधी माहिती का दिली नाही, असा प्रश्न केला होता. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी PADU मशीन केवळ अपवादात्मक परिस्थितीतच वापरले जाईल, अशी भूमिका मांडली आहे.
याचदरम्यान, प्रचार कालावधी संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघर प्रचाराची मुभा देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णयही वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आतापर्यंतच्या निवडणूक इतिहासात प्रथमच असा निर्णय घेण्यात आला असून 13 जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत जाहीर प्रचार करता येणार आहे. मात्र, त्यानंतर 15 जानेवारीपर्यंत उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याची परवानगी देण्यात आली असून कोणत्याही प्रकारची पत्रके वाटता येणार नाहीत, असे आयोगाच्या इतिवृत्तात नमूद करण्यात आले आहे. या निर्णयामुळेही निष्पक्षतेबाबत विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
दरम्यान, राज्यातील 29 महापालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात होणार असून त्यासाठी पहाटेपासूनच अनेक मतदान केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, तर अनेक वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक होत असल्याने काही नागरिकांकडून नाराजीही व्यक्त केली जात आहे. निवडणूक आयोगाच्या सलग निर्णयांमुळे या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष अधिकच केंद्रित झाले आहे.







