Nationalist leaders object to EVMs, tension also in Mumbai-Nalasopara : ईव्हीएमवर राष्ट्रवादी नेत्यांचा आक्षेप, मुंबई- नालासोपाऱ्यातही तणाव
Mumbai : राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू असताना पुणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे विविध कारणांमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी ईव्हीएममधील तांत्रिक त्रुटींचे आरोप झाले असून, तर काही ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पुण्यातील प्रभाग क्रमांक 27 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासमोर अडचणी वाढल्याचे दिसून येत आहे. या प्रभागात अजित पवार गटाचे चार तर शरद पवार गटाचे दोन बंडखोर उमेदवार रिंगणात असल्याने पक्षांतर्गत गोंधळ निर्माण झाला आहे. दिलीप शंकर अरुंदेकर आणि अक्षदा प्रेमराज गदादे या दोन उमेदवारांना पक्षाकडून अर्ज मागे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र त्यांनी उमेदवारी कायम ठेवली. या उमेदवारांनी अधिकृत उमेदवारी नसतानाही प्रचारासाठी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे फोटो वापरल्याचा आरोप शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी केला आहे. या अनधिकृत वापराविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे काकडेंनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पुण्यातच मतदानादरम्यान ईव्हीएमबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. अंकुश काकडे यांनी मतदान केंद्रावर ईव्हीएममधील तांत्रिक बिघाडावर आक्षेप घेतला. मी चौथ्या क्रमांकाचे बटण दाबले, मात्र त्यावरील लाईट लागली नाही, असा दावा त्यांनी केला. बटण दाबूनही लाईट न लागल्याने त्यांनी तेथील निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि तक्रार नोंदवली जात नाही तोपर्यंत मतदान केंद्र सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला. यामुळे काही काळ मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मुंबईतील चेंबूर परिसरातही मध्यरात्रीच्या सुमारास मोठा गोंधळ झाला. प्रभाग क्रमांक 153 मधील बीएमसी शाळेतील मतदान केंद्राच्या परिसरात एक व्यक्ती बोगस ओळखपत्रासह फिरताना शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेनंतर स्थानिक आमदार तुकाराम काते आणि ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. रविंद्र महाडीक नावाच्या संशयित व्यक्तीला गोवंडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तो मध्यरात्री दीडच्या सुमारास मतदान केंद्रात का शिरला होता, याचा तपास निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस करत आहेत.
धुळे शहरातही निवडणूक प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. शिवसेना महानगरप्रमुख संजय वाल्हे यांनी अनेक मतदान केंद्रे मतदारांच्या घरांपासून लांब ठेवण्यात आल्याचा आरोप केला आहे. शेवटच्या क्षणी मतदान केंद्रांची ठिकाणे बदलल्यामुळे मतदारांना केंद्र शोधताना अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. याचा थेट परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
Nana Patole : शेतकऱ्याला बुटाने मारहाण करणाऱ्या मुजोर कृषी अधिकाऱ्याला धडा शिकवा
पालघर जिल्ह्यातील नालासोपारा पूर्व येथील पेल्हार फाटा परिसरात मध्यरात्री एका कारमधून 29 बॉक्स दारू जप्त करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संशयास्पद गाडी थांबवून तपासणी केली असता हा साठा आढळून आला. मतदारांना मतदानासाठी दारूचे आमिष दाखवले जात असल्याचा आरोप करण्यात आला असून, पेल्हार पोलिसांनी गाडीसह दारू जप्त केली आहे. ही दारू कोणासाठी आणि कुठून आणण्यात आली होती, याचा तपास सुरू आहे.
राज्यातील विविध भागांतून समोर येणाऱ्या या घटनांमुळे महापालिका निवडणुकीदरम्यान गोंधळ, आरोप-प्रत्यारोप आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.








