Opium crop worth twelve and a half crores seized by the police : पोलिसांनी केले जप्त; अंढेरा शिवारात कारवाई
Buldahana स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा शिवारात मोठी कारवाई करत १२ कोटी ६० लाख २८ हजार रुपये किंमतीचे अवैध अफूचे पीक जप्त केले आहे. या कारवाईदरम्यान एका संशयिताला अटक करण्यात आली असून, जिल्ह्यातील गेल्या काही वर्षांतील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
शेतात मध्यभागी अफूची लागवड – पोलिसांचा धक्कादायक शोध
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव संतोष मधूकर सानप (वय ४९, रा. अंढेरा) असे आहे. त्याने आपल्या शेतातील मध्यभागी, कोणालाही सहज लक्षात न येण्याच्या पद्धतीने अफूची लागवड केली होती. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे २१ फेब्रुवारी रोजी रात्री पोलिसांनी शेतात छापा टाकला.
सुरुवातीला पोलिसांना काही प्रमाणात अफूच्या झाडांची अपेक्षा होती, परंतु प्रत्यक्षात तब्बल १६ गुंठे शेतजमिनीवर अफूचे पीक जोपासले गेले असल्याचे समोर आले. यामुळे पोलिसांच्याही भुवया उंचावल्या.
पोलिसांनी शुक्रवारी रात्री ११.३० वाजता संपूर्ण कारवाई सुरू केली. एक जनरेटर आणि वजन मोजण्यासाठी काटा घेऊन पोलीस पथक शेतात पोहोचले आणि संपूर्ण अफूच्या पिकाची मोजणी करण्यात आली. यामध्ये १५ क्विंटल ७२ किलो म्हणजेच १५७२ किलो वजनाच्या अफूच्या झाडांची लागवड करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पहाटे ८ वाजेपर्यंत ही कारवाई सुरू ठेवत संपूर्ण अफूचे पीक जप्त केले.
या प्रकरणात नारकोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉप सब्स्टन्सेस (NDPS) कायद्यातील कलम ८(क) आणि १८(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अफूचे संपूर्ण पीक ताब्यात घेत आरोपीला अटक केली. पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात परिसरातील आणखी कोणी सहभागी आहे का, याचा शोध घेण्यात येत आहे. तपासाची सूत्रे देऊळगाव राजा उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीपीओ) मनिषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. गेल्या ३५ वर्षांतील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत असून, अमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील पोलिसांचे हे मोठे यश मानले जात आहे. जिल्ह्यात अफू व इतर अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.








