Big shock to ex-minister nitin Raut, ketan Thakre to be co-opt corporator in Nagpur municipal corporation: नागपूर महापालिकेतील काँग्रेसच्या हाय व्होल्टेज ड्रामावर पडदा
Nagpur नागपूर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीवरून काँग्रेसमध्ये रंगलेल्या हायव्होल्टेज ड्राम्यावर अखेर पडदा पडला असून, माजी मंत्री नितीन राऊत यांच्या विरोधानंतरही आमदार विकास ठाकरे यांचे सुपुत्र केतन ठाकरे आणि अतुल कोटेचा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या नियुक्तीमुळे नागपूर काँग्रेसमधील गटबाजी आणि अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून नितीन राऊत यांना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
नागपूर शहरात काँग्रेसचे दोन आमदार असल्याने विकास ठाकरे आणि नितीन राऊत यांना प्रत्येकी एका सदस्याचे नाव सुचवण्याचे अधिकार देण्यात आले होते. मात्र, राऊत गटाला वेळेत निर्णय घेता न आल्याने नाट्यमय घडामोडी घडल्या.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम क्षणापर्यंत राऊत गटाकडून कोणतेही नाव गटनेते संजय महाकाळकर यांच्यापर्यंत पोहोचले नाही. अखेर महाकाळकर यांनी केतन ठाकरे आणि अतुल कोटेचा यांची नावे आयुक्तांकडे सादर केली. यावरून नितीन राऊत यांनी संताप व्यक्त करत ‘दलित कार्ड’ पुढे केले आणि आपला हक्क हिरावल्याचा आरोप केला. त्यांनी या वादात थेट प्रदेशाध्यक्षांनाच आव्हान दिल्याने पक्षात मोठी खळबळ उडाली होती.
दरम्यान, या वादावर आता काँग्रेस कार्यकर्त्यांमधूनच राऊत यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. निवडणूक हरलेल्या उमेदवाराला संधी देणार नाही, असा पक्षाचा नियम असतानाही राऊत यांनी सुरेश जग्यासी यांचे नाव का रेटले? आणि जर दलितालाच संधी द्यायची होती, तर बंडोपंत टेंभूर्णे यांचे नाव वेळेत का दिले नाही? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.
Khadse vs wagh : रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ यांच्यात सोशल मीडियावरून पुन्हा शब्दयुद्ध!
विशेष म्हणजे, महापालिका निवडणुकीत राऊत यांच्या ताठर भूमिकेमुळे महाविकास आघाडीची शक्य असलेली युती फिस्कटली होती, असा आरोपही आता जोर धरू लागला आहे. शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी एकही जागा न सोडण्याच्या भूमिकेमुळे आघाडी फुटली आणि एमआयएम तसेच मुस्लिम लीगने स्वतंत्र लढून जागा जिंकल्या.
जर राऊत यांनी लवचिक भूमिका घेतली असती, तर आज काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या मोठी असती, असा दावा उत्तर नागपुरातील कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या वादावरून राऊत यांना खडेबोल सुनावल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून, केतन ठाकरे यांच्या निवडीने विकास ठाकरे गटाचे पारडे जड झाले आहे.








