Chandrapur alliance triggers tensions in Maha Vikas Aghadi : चंद्रपूरमधील ‘भाजप-सेना’ युतीवरून महाविकास आघाडीत ठिणगी!
Nagpur कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जायचे नाही असे ठरवले असताना, चंद्रपूरमध्ये भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने युती केली आहे. एवढेच नव्हे तर ‘उबाठा’ गट तिथे सत्तेतही सहभागी झाला आहे. त्यावरून महाविकास आघाडीमध्ये सध्या चांगलीच खडाजंगी सुरू आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी “शिवसेनेने आघाडी धर्म पाळला नाही,” असा थेट आरोप केला आहे.
या युतीवर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आपले हात झटकले आहेत. “हा पक्षाचा किंवा उद्धव ठाकरे यांचा अधिकधिक निर्णय नाही. हा सर्व प्रकार स्थानिक नेत्यांनी केला असून, त्यांच्यावर कारवाई निश्चित होईल,” असे सांगत राऊत यांनी आपण या युतीचे समर्थन करत नसल्याचे जाहीर केले.
Buldhana Politics : बुलढाणा काँग्रेसमध्ये मोठी गळती; मित्रपक्ष आणि विरोधकांनीच फोडली खिंडार!
हे सर्व करत असतानाच संजय राऊत यांनी काँग्रेसलाही कानपिचक्या दिल्या. “तुमचेच नेते आपसात भांडत होते. प्रदेशाध्यक्षांनी दिलेला फॉर्म्युलादेखील काँग्रेस नेते मान्य करायला तयार नव्हते. हा वाद दिल्लीपर्यंत पोहोचला होता. सत्ता स्थापन करण्यासाठी लागणारे नगरसेवकांचे संख्याबळ गोळा करण्याची जबाबदारी काँग्रेसचीच होती, मात्र शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये एकमत नव्हते,” असे सांगून त्यांनी या स्थितीसाठी काँग्रेसलाच जबाबदार धरले.
तत्पूर्वी, चंद्रपूर महापालिकेत उद्धव ठाकरे सेनेने दगा दिल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ चांगलेच संतापले होते. “याचे परिणाम उद्धव सेनेला भोगावे लागतील. परभणीत उद्धव सेनेला सत्ता स्थापन करण्याची गरज भासणार आहे, त्यावेळी आम्ही वचपा घेऊ,” असा इशारा सपकाळांनी दिला होता. मात्र, प्रत्यक्षात परभणीत उपमहापौरपद घेऊन काँग्रेस ‘उबाठा’ गटासोबत सत्तेत सहभागी झाली.
“आम्ही युती धर्म पाळला,” असेही सपकाळांनी यावेळी जाहीर केले. दरम्यान, चंद्रपूरमधील उद्धव ठाकरे सेनेच्या नगरसेवकांसोबत पक्षातील एक वेगळाच नेता वाटाघाटी करत होता. आमदार वरुण सरदेसाई हे नगरसेवकांच्या संपर्कात होते, असे आता समोर आले आहे. त्यावरून संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली असून हा सर्व प्रकार उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातल्याचे सांगितले जाते.
चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचे २७, तर भाजपचे २३ नगरसेवक निवडून आले होते. बहुमतासाठी ३३ मतांची गरज होती. असे असतानाही भाजपने बाजी मारली आणि शिवसेनेची ६ मते आपल्याकडे वळवून काँग्रेसच्या तोंडून विजयाचा घास हिरावून घेतला. शिवसेनेला सव्वा वर्षानंतर महापौरपद, दोन वेळा स्थायी समिती सभापतीपद आणि उपमहापौरपद देण्याचे भाजपने कबूल केले आहे.








