व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Chhagan bhujbal : “हम कबड्डी के खिलाड़ी हैं, शतरंज के नहीं”; भुजबळांचे...

Chhagan bhujbal : “हम कबड्डी के खिलाड़ी हैं, शतरंज के नहीं”; भुजबळांचे सूचक वक्तव्य!

 

chhagan-bhujbal-first-reaction-on-rajya-sabha-candidature-kabaddi-player-statement-ncp-politics : राज्यसभा उमेदवारीवर मांडली ‘मलाही समान न्याय मिळावा’ची भूमिका

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा असलेल्या ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अखेर या संपूर्ण घडामोडींवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाने त्यांच्या ऐवजी राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. याच पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी “हम कबड्डी के खिलाड़ी हैं, शतरंज के नहीं” असे सूचक विधान करत आपली भूमिका स्पष्ट केली.

राज्यसभेच्या उमेदवारीबाबत बोलताना छगन भुजबळ यांनी सांगितले की, त्यांना लोकसभा किंवा राज्यसभा यापैकी कोणत्याही सभागृहात जाण्याची इच्छा होती. यापूर्वीही अनेक वेळा संधी जवळ येऊनही ती मिळाली नाही, असे त्यांनी नमूद केले. यावेळी राज्यसभेवर जाण्याची तयारी त्यांनी दर्शविली होती. मात्र पक्षाने वेगळा निर्णय घेतल्याने तो स्वीकारल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Rain alert : राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट, पुढील ४८ तास निर्णायक !

समीर भुजबळ यांच्या संभाव्य मंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य करताना भुजबळ म्हणाले की, त्यांनी कोणताही विशेष आग्रह धरलेला नव्हता, तर पक्षातील इतर नेत्यांना लागू असलेला समान निकष आपल्यालाही लागू करावा, एवढीच अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांनी उदाहरण देताना मकरंद पाटील मंत्री असून त्यांचे बंधू खासदार आहेत, सुनेत्रा पवार मंत्री असताना त्यांचे पुत्र खासदार आहेत, तसेच सुनील तटकरे खासदार असून त्यांचे पुत्र आमदार आहेत, असे सांगितले. त्यामुळे इतरांना जसा न्याय मिळतो, तसाच न्याय आपल्यालाही मिळावा, अशी विनंती पक्ष नेतृत्वाकडे केली होती, असे त्यांनी स्पष्ट केले.

भुजबळ यांनी भाजप नेतृत्वाने त्यांच्या प्रस्तावाला थेट नकार दिल्याच्या चर्चांनाही फेटाळले. संबंधित प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला होता. मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी त्याबाबत विचार केला जाईल, अशी माहिती मिळाली होती. त्यामुळे प्रस्तावाला स्पष्ट नकार मिळाल्याचे म्हणणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यसभा उमेदवारी न मिळाल्याने नाराज आहात का, असा प्रश्न विचारला असता भुजबळ यांनी नाराजीचे वृत्त नाकारले. राजकारणात अशा गोष्टी घडत असतात. आज नाही तर उद्या संधी मिळू शकते. आपण कबड्डीचे खेळाडू आहोत, बुद्धिबळाचे नाही. राजकारणातील डावपेचांपेक्षा संघर्ष आणि मैदानातील खेळावर आपला विश्वास असल्याचे त्यांनी आपल्या खास शैलीत सांगितले.

Rajya Sabha candidature : छगन भुजबळांची अट, दिल्लीचा संदेश आणि राजेंद्र जैन यांची राज्यसभेवर वर्णी

राजेंद्र जैन यांच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले की, मागील काही दिवसांपासून पक्षात राज्यसभा आणि लोकसभा यासंदर्भात चर्चा सुरू होती. त्यांनी स्वतः राज्यसभेवर जाण्याची तयारी दर्शविली होती. मात्र पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा आदर करणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, राजेंद्र जैन यांनी राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि छगन भुजबळ उपस्थित होते. अर्ज दाखल करण्यापूर्वी राजेंद्र जैन यांनी छगन भुजबळ यांना वाकून नमस्कार केल्याचे दृश्य चर्चेचा विषय ठरले. पक्षातील एकात्मता आणि वरिष्ठ नेत्यांबद्दलचा आदर दाखवणारे हे चित्र असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.

राज्यसभा उमेदवारीच्या निर्णयानंतर विविध तर्कवितर्कांना उधाण आले असले तरी छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांनी पक्षाविरोधात कोणतीही भूमिका घेतलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी “समान न्याय” या मुद्द्यावर त्यांनी मांडलेली भूमिका आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील पुढील राजकीय घडामोडींवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

_

error: Content is protected !!