local-leaders-supporting-curroption-in-msrtc-congress-shrirang-barge : गैरप्रकार थांबला नाही तर घरांवर मोर्चा आणू, काँग्रेसचा इशारा
Amravati राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) अमरावती विभागात उघडकीस येत असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना काही स्थानिक लोकप्रतिनिधी पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. हा प्रकार तात्काळ थांबवला नाही, तर संबंधित लोकप्रतिनिधींच्या घरांवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
अमरावती येथील काँग्रेस भवनात आयोजित एसटी कर्मचाऱ्यांच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते. बरगे म्हणाले की, अमरावती विभागात अलीकडच्या काळात पास घोटाळा, तिकीट घोटाळा तसेच मद्यपानाशी संबंधित प्रकारांसह अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आली आहेत. एसटीच्या सुरक्षा व दक्षता विभागाने काही अधिकाऱ्यांना दोषी ठरवले असले, तरी त्यांना पाठीशी घालणारे काही अधिकारी अद्यापही जिल्ह्यात ठाण मांडून बसले आहेत.
ते पुढे म्हणाले की, एखाद्या वाहकाकडून दोन–पाच रुपयांची चूक झाली, तरी त्यांना तत्काळ निलंबित केले जाते, बदली केली जाते किंवा बडतर्फीची कारवाई होते. किरकोळ अपघातात गाडीचा पत्रा घासला गेला, तरी चालकांकडून वसुली केली जाते. गाडी ब्रेकडाऊन झाल्यास यांत्रिकांनाही दोषी ठरवले जाते. मात्र, लाखो रुपयांचा अपहार करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
अशा अधिकाऱ्यांवर बदलीसारखी कारवाई करण्याचा प्रयत्न झाला, तरी ती रोखण्याचे काम काही स्थानिक लोकप्रतिनिधी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
Sudhir mungantiwar : महाराष्ट्र विधानसभेत ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक २०२६’ सादर
बरगे म्हणाले की, अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यामुळे एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत सापडले आहे. महामंडळाला पुन्हा उभारी देण्यासाठी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर लगाम घालण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठोस भूमिका घेतली आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी त्यांच्या भूमिकेलाच छेद देण्याचे काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. यापुढे तरी अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम लोकप्रतिनिधींनी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.








