मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांचा रोष कमी करणार
Mumbai राज्यातील सुमारे ७५ टक्के तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतरही मदतीपासून वंचित राहिलेल्या उर्वरित तालुक्यांमधील तीव्र असंतोष आणि लोकप्रतिनिधींच्या मागण्यांची दखल घेत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दुष्काळी यादीतून वगळण्यात आलेल्या सर्व तालुक्यांना ‘ट्रिगर-२’ नुसार दुष्काळाचे सर्व आवश्यक लाभ व मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, एकाच तालुक्याच्या एका भागात समाधानकारक पाऊस पडतो, तर दुसऱ्या टोकाला अपुरा पाऊस झाल्याने पिके करपून जातात; त्यामुळे प्रत्यक्ष शेतातील पिकांची अवस्था बघून तांत्रिक निकषांच्या पलीकडे जात या सर्व तालुक्यांना मदत दिली जाणार आहे.
‘मत चोरी’च्या आरोपावरून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या बडतर्फीची मागणी
प्रारंभिक दुष्काळ यादीत विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांतील प्रत्येकी एकाच तालुक्याचा समावेश करण्यात आला होता, तर चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तालुके सुटल्यामुळे स्थानिक शेतकरी व लोकप्रतिनिधींमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरसह विदर्भातील सुटलेल्या तालुक्यांसाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, तसेच कोकणातीलही अनेक टंचाईग्रस्त तालुक्यांना पहिल्या टप्प्यात वगळण्यात आले होते.
५०० ट्रक, ४० टोलनाक्यांचे मालक प्यारे खान आरटीओला एवढे ‘प्यारे’ का?
सर्व पक्षीय आमदार व लोकप्रतिनिधींच्या या आग्रही मागणीची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्र्यांनी हा दिलासादायक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता बाधित तालुक्यातील शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट, शेती कर्जाच्या वसुलीस स्थगिती व कर्ज पुनर्गठन, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात माफी, शेतीपंपांच्या वीज बिलात सवलत आणि टँकरने पाणीपुरवठा यांसारखे ‘ट्रिगर-२’ अंतर्गत मिळणारे सर्व दुष्काळी लाभ मिळणार असून तांत्रिक कारणांमुळे अडकलेली सरकारी मदत आता थेट शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे.








