व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Devendra fadnavis : “पेरणीची घाई नको”; महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे शेतकऱ्यांना...

Devendra fadnavis : “पेरणीची घाई नको”; महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे शेतकऱ्यांना आवाहन

devendra-fadnavis-important-appeal-to-farmers-on-maharashtra-day-2026 : सरासरी पावसाचे प्रमाण कमी, एलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क

Mumbai : महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे. यंदा एलनिनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये आणि कृषी विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने पाणी, चारा, खत आणि बियाणे यांचे नियोजन सुरू केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नसून आत्मपरीक्षणाचा दिवस असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याने विकासाच्या अनेक क्षेत्रांत मोठी झेप घेतली आहे. जगभरात आर्थिक आणि भूराजकीय संकटांचे वातावरण असतानाही महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेला भक्कम योगदान देत आहे. राज्याचा देशाच्या सकल देशांतर्गत उत्पन्नात जवळपास १४ टक्के वाटा असून २०२४-२५ या आर्थिक वर्षात महाराष्ट्राने १ लाख ६४ हजार ८७५ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आकर्षित केली असल्याचा दावा त्यांनी केला.

Sureshkumar jethaliya : अजितदादांचे विश्वासू नेते, सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराने निधन

डावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने तब्बल ३० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले असून त्यातून सुमारे ४० लाख रोजगार निर्माण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र आज जगातील ३० वी मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येत असल्याचे सांगत त्यांनी गडचिरोली, नंदुरबार आणि धुळे यांसारखे जिल्हेही गुंतवणुकीच्या नकाशावर येत असल्याचा उल्लेख केला.

पायाभूत सुविधांबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई, पुणे आणि नागपूर येथे सध्या १७३ किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग कार्यरत असून दरवर्षी ५० किलोमीटर नवीन मेट्रो मार्ग सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक सामान्य नागरिकाचे जीवनमान उंचावणे हा विकासामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Sunetra pawar : महाराष्ट्र दिनी सुनेत्रा पवारांचा अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार !

शेतकऱ्यांना दिलासा देताना मुख्यमंत्री म्हणाले की, जलयुक्त शिवार आणि गाळयुक्त शिवार योजनांना गती देण्यासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. ठिबक आणि तुषार सिंचनाचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन करत त्यांनी पाण्याची बचत हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याचे म्हटले. राज्यात खत आणि बियाण्यांचा तुटवडा भासू नये यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना राज्य सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास दिला.

यावेळी त्यांनी २०४७ पर्यंत महाराष्ट्राला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य राज्य सरकारने निश्चित केले असून विकसित महाराष्ट्राचा आराखडा तयार करण्यात आल्याचेही सांगितले. कितीही नैसर्गिक संकटे आली तरी महाराष्ट्राचा विकासरथ थांबणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

__

error: Content is protected !!