व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण ‘यांचा मेंदूच चोरीला गेला’ फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल!

‘यांचा मेंदूच चोरीला गेला’ फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल!

व्यवस्थेबाबत अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप

Nagpur : ईव्हीएम, मतदार याद्या आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. संवैधानिक संस्थांवर सातत्याने प्रश्न उपस्थित करून जनतेमध्ये व्यवस्थेबाबत अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

भारतीय संविधानाचा दाखला राहुल गांधी देत असले, तरी संविधानाने निर्माण केलेल्या लोकशाही व्यवस्था आणि संवैधानिक संस्था त्यांना मान्य नसल्याचे फडणवीस म्हणाले. त्यांच्या मते, संवैधानिक संस्थांची विश्वासार्हता कमी करण्याचा प्रयत्न होत असून त्यातून संविधानाबाबतही जनतेच्या मनात संशय निर्माण होऊ शकतो. राहुल गांधींची भूमिका अतिडाव्या विचारसरणीकडे झुकलेली असल्याचाही दावा त्यांनी केला.

ईव्हीएमबाबत यापूर्वी उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने या विषयावर निर्णय दिलेला आहे. तसेच ईव्हीएममध्ये फेरफार करता येतो, असा दावा करणाऱ्यांना निवडणूक आयोगाने आव्हान दिले होते; मात्र त्या प्रक्रियेत कोणीही ते सिद्ध करू शकले नाही, असा दावा त्यांनी केला. आता ईव्हीएमनंतर थेट निवडणूक आयोगाला लक्ष्य केले जात असल्याचेही त्यांनी म्हटले.

कागदी जीआर काढून शेतकऱ्यांचे पोट भरणार नाही, वडेट्टीवारांचा घणाघात

‘व्होट चोरी’च्या आरोपांवर बोलताना फडणवीस यांनी विरोधकांवर उपरोधिक शब्दांत टीका केली. काही जण निवडणुका रद्द करण्याची मागणी करत असल्याचा उल्लेख करत, ‘व्होट चोरी’ म्हणणाऱ्यांचा ‘मेंदूच चोरीला गेला आहे’, अशी बोचरी टिप्पणी त्यांनी केली. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

मतदार याद्यांमधील बदलांवरून सुरू असलेल्या वादावरही फडणवीसांनी भूमिका मांडली. विशेष पुनरिक्षणाच्या प्रक्रियेत राजकीय पक्षांना बूथ लेव्हल एजंट आणि बूथ लेव्हल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सहभागाची संधी असते, असे त्यांनी सांगितले. स्थलांतरामुळे विशेषतः शहरांमध्ये एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदार नोंदणीसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात, असा दावा त्यांनी केला.

पश्चिम बंगालमधील काही मतदारसंघांचा संदर्भ देत त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, मोठ्या प्रमाणावर मतदार कमी झाले असतील तर संबंधित मतदारसंघांमध्ये तृणमूल काँग्रेसचे उमेदवार कसे विजयी झाले. मतदार यादीतील प्रक्रियेवर आक्षेप घेण्याऐवजी राजकीय पक्षांनी आत्मपरीक्षण करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

बल्लारपूर, ब्रह्मपुरी व जिवतीच्या दुष्काळग्रस्त यादीतील समावेशासाठी आ. सुधीर मुनगंटीवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार

दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबतही फडणवीसांनी माहिती दिली. २६५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले असून या भागांमध्ये मदतीसाठी तातडीच्या उपाययोजनांना मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आवश्यक ठिकाणी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असून त्यानुसार मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ईव्हीएमपासून मतदार याद्या आणि निवडणूक आयोगापर्यंतच्या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत. त्यामुळे फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात हा राजकीय वाद आणखी रंगण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!