dj-ban-maharashtra-dj-health-religion-public-sentiment-analysis : डीजे, डॉल्बी आणि लेझरच्या वापरावरून वातावरण तापले
Nagpur : महाराष्ट्रात सध्या डीजेचा आवाज केवळ स्पीकरमधून येत नाही, तर राजकारण, समाजमाध्यमे आणि प्रशासनातही घुमतो आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे, सोलापूर आणि नागपूरसह राज्यातील अनेक भागांत डीजे, डॉल्बी आणि लेझरच्या वापरावरून वाद पेटला आहे. मात्र या सगळ्या गदारोळात एक साधा प्रश्न कुठेतरी हरवतोय उत्सव महत्त्वाचा की माणसाचे आरोग्य?
पुण्यात ध्वनिप्रदूषणाविरोधात भूमिका घेणारे विद्यानंद बापट यांच्यावर झालेला हल्ला या वादाचे गंभीर रूप दाखवतो. मतभेद असू शकतात, भूमिका वेगळ्या असू शकतात; पण एखाद्याला मारहाण करून त्याचा आवाज बंद करणे हा कोणत्याही उत्सवाचा भाग होऊ शकत नाही. बापट आज चर्चेत आहेत; उद्या हा विषय मागे पडेल. मात्र त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न कायम राहणार आहे. डीजेचा विरोध म्हणजे हिंदूंच्या सणाचा विरोध, असे समीकरण मांडणे हा मूळ प्रश्नापासून पळण्याचा प्रकार आहे. आवाजाचा परिणाम हिंदू, मुस्लिम किंवा कोणत्याही धर्माच्या माणसावर वेगळा होत नाही. रुग्णालयातील रुग्ण, वृद्ध, लहान मुले, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना होणारा त्रास धार्मिक ओळख पाहून होत नाही. त्यामुळे डीजेचा मुद्दा धर्माचा नसून ध्वनी, आरोग्य आणि कायद्याचा आहे.
नागपुरात माजी आमदार संदीप जोशी यांनी डीजे आणि लेझरच्या अतिरेकाला विरोध करत सर्व धर्मांच्या उत्सवांसाठी समान नियमांची भूमिका घेतली. दुसरीकडे आमदार प्रवीण दटके यांनी केवळ हिंदूंच्या सणांवेळीच बंदी का, असा सवाल उपस्थित केला. राजकीय मतभेद असणे स्वाभाविक आहे; मात्र या चर्चेचा केंद्रबिंदू लोकभावना की लोकांचे आरोग्य, हा असायला हवा. पुणे आणि नागपुरातील प्रशासनाच्या निर्णयांनी आणखी एक गोष्ट स्पष्ट केली आहे ध्वनिप्रदूषणासाठी नियम आधीपासून आहेत. न्यायालयीन निर्देश आहेत. रात्रीच्या वेळेवरील निर्बंध आहेत. उच्च क्षमतेच्या ध्वनिव्यवस्थेवर कारवाईचे अधिकार प्रशासनाला आहेत. मग प्रश्न बंदीचा कमी आणि कायदा पाळण्याचा अधिक आहे.
Manoj Jarange : उपोषण मागे घेण्यास स्पष्ट नकार, ११ सप्टेंबरची डेडलाईन
डीजेबरोबरच अतितीव्र लेझरचा मुद्दाही गंभीर आहे. आवाजामुळे कानांवर परिणाम होऊ शकतो, तर चुकीच्या पद्धतीने वापरलेला लेझर डोळ्यांसाठी धोकादायक ठरू शकतो. तरीही भक्ती, परंपरा आणि प्रतिष्ठेच्या नावाखाली अतिरेकाचे समर्थन कशासाठी? होय, डीजे आणि साउंड व्यवसायातून अनेकांचा रोजगार चालतो. त्यामुळे सरसकट बंदीऐवजी ध्वनिमर्यादा, वेळेचे बंधन आणि सर्वांसाठी समान नियम हा अधिक व्यवहार्य मार्ग आहे.
शेवटी प्रश्न डीजे हवा की नको, एवढाच नाही. प्रश्न आहे आपला आनंद दुसऱ्याच्या आरोग्याच्या किंमतीवर का?उत्सव मोठा हवा, आवाज नाही. भक्ती मोठी हवी, दिखावा नाही. परंपरा हवी, पण अतिरेक नको. आणि देवाला प्रसन्न करण्यासाठी खरंच एवढ्या मोठ्या आवाजाची गरज असेल, तर एक प्रश्न आपण स्वतःलाच विचारायला हवा देव मोठ्या आवाजात आहे की आपल्या विवेकात?








