व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Eknath Shinde : शाळा दत्तक घ्या, दर आठवड्याला प्रगतीचा आढावा घ्या

Eknath Shinde : शाळा दत्तक घ्या, दर आठवड्याला प्रगतीचा आढावा घ्या

eknath-shinde-maharashtra-school-adopt-schools-weekly-review-dada-bhuse-meeting : एकनाथ शिंदेंचे आमदार-खासदारांना आवाहन, चार तास मॅरेथॉन बैठक

Mumbai : राज्यातील शाळांचे आधुनिकीकरण करून विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी आणि आव्हानांसाठी सक्षम करणारी आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि भविष्यवेधी शिक्षणव्यवस्था उभारण्यासाठी सरकारने मिशन मोडवर काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबईतील नंदनवन बंगल्यावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तब्बल चार तास झालेल्या बैठकीत राज्यातील शिक्षण व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीत शिक्षण विभागाच्या विविध योजना, उपक्रम आणि आतापर्यंत झालेल्या कामकाजाची माहिती अधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना दिली. शिक्षण विभागाकडून सुरू असलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करताना हे उपक्रम केवळ कागदावर न राहता राज्यातील प्रत्येक शाळा आणि विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले पाहिजेत, यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. आजच्या विद्यार्थ्यांच्या आकांक्षा आणि भविष्यातील गरजा वेगाने बदलत आहेत. त्यामुळे त्यानुसार शाळांमध्येही बदल होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला भविष्यातील संधी आणि आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम करणारी शिक्षणव्यवस्था उभारणे गरजेचे आहे, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली.

शाळांचे आधुनिकीकरण, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिक्षकांचे प्रशिक्षण, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यासाठी स्पष्ट, सर्वसमावेशक आणि कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शिक्षण व्यवस्थेतील बदल घडवून आणताना शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांना या कृती आराखड्यात सहभागी करून घेण्यात येणार आहे. शिक्षकांसाठी सातत्यपूर्ण प्रशिक्षण, प्रोत्साहन आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यासोबतच उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचा योग्य सन्मान आणि गौरव करण्यावर भर देण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या विविध शिक्षणविषयक योजनांचा राज्यातील विद्यार्थ्यांना अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी त्यांची प्रभावी आणि गतिमान अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही एकनाथ शिंदे यांनी दिल्या. योजनांचा लाभ शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतो आहे की नाही, याची नियमित पाहणी करण्यावरही भर देण्यात आला. शिक्षण म्हणजे केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणे किंवा परीक्षेत गुण मिळवणे नव्हे. विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक विकास हा शिक्षणव्यवस्थेचा केंद्रबिंदू असला पाहिजे, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यासाठी विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी, पोषण, मध्यान्ह भोजन योजनेची गुणवत्ता आणि अंमलबजावणी तसेच विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य आणि भावनिक स्वास्थ्यासाठी आवश्यक उपक्रमांना अधिक महत्त्व देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

शाळांचा विकास केवळ शासनाच्या प्रयत्नांतून न करता पालक, माजी विद्यार्थी आणि स्थानिक समाजाच्या सक्रिय सहभागातून करण्यावर भर देण्यात येणार आहे. शाळांच्या गरजा ओळखून स्थानिक पातळीवर उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करण्यासाठी समाजातील विविध घटकांना शिक्षण प्रक्रियेशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शिक्षण विभागाकडून राबविण्यात येणारे चांगले उपक्रम आणि त्यातून होणारे सकारात्मक बदल प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

Sir Voter List : ९० विधानसभा मतदारसंघांत ‘एसआयआर’चा मोठा धक्का;

आपापल्या मतदारसंघातील शाळांचा विकास करण्यासाठी आमदार आणि खासदारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात येणार आहे. आमदार-खासदारांनी शाळा दत्तक घेऊन उपलब्ध निधी, स्थानिक संसाधने आणि विविध माध्यमांतून शाळांच्या विकासासाठी योगदान द्यावे, अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आली. शाळांमध्ये पायाभूत सुविधा, डिजिटल साधने, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा आणि गुणवत्तापूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.

राज्यातील शाळांचे आधुनिकीकरण करण्यासाठी उद्योग आणि कॉर्पोरेट क्षेत्राची व्यावसायिक क्षमता वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तंत्रज्ञान, शिक्षक प्रशिक्षण, कौशल्यविकास, पायाभूत सुविधा आणि अन्य आवश्यक संसाधनांच्या उपलब्धतेसाठी उद्योगक्षेत्रातील प्रमुख आणि कॉर्पोरेट प्रतिनिधींशी बैठका घेण्यात येणार आहेत. यामुळे सरकारी यंत्रणा, लोकप्रतिनिधी, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि कॉर्पोरेट क्षेत्र यांच्या समन्वयातून शाळांच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शिक्षण क्षेत्रासाठी तयार करण्यात येणाऱ्या कृती आराखड्याची अंमलबजावणी केवळ कागदोपत्री राहू नये, यासाठी दर आठवड्याला प्रगतीचा आढावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामातील अडचणी तातडीने दूर करून विविध उपक्रमांना गती देण्यासाठी या आढावा बैठकीत आवश्यक निर्णय घेतले जाणार आहेत.

Rahul Gandhi pune visit: राहुल गांधींच्या कार्यक्रमावरून भाजप-काँग्रेस आमनेसामने, आता नागपुरात रंगणार राजकारण

शाळा बदलल्या तर विद्यार्थ्यांचे भविष्य बदलेल आणि विद्यार्थ्यांचे भविष्य बदलले तर महाराष्ट्राचे भविष्य बदलेल, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक चांगला उपक्रम मिशन मोडवर पुढे नेऊन त्याचा थेट लाभ राज्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चार तासांच्या या बैठकीत राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील विविध प्रश्न, सुरू असलेल्या योजना, शाळांचे आधुनिकीकरण, शिक्षक प्रशिक्षण, विद्यार्थ्यांचे आरोग्य व मानसिक स्वास्थ्य, लोकप्रतिनिधींचा सहभाग आणि उद्योग क्षेत्राच्या सहकार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यामुळे आगामी काळात राज्यातील शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी शासनाकडून अधिक गतिमान आणि परिणामकारक पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!