BJP-Congress trade accusations over Rahul Gandhi’s programme in Nagpur : मुख्यमंत्री फडणविसांचे आज नागपुरात युवाशक्ती प्रदर्शन
Nagpur राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून भाजप आणि विरोधकांमध्ये नवा वाद पेटला आहे. पुण्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमावरून सुरू झालेला राजकीय कलगीतुरा आता थेट नागपूरच्या रेशीमबाग मैदानापर्यंत पोहोचला आहे.
पुण्यातील राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात पैसे देऊन विद्यार्थी आणल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला होता. भाजपच्या या आरोपाला ठाकरे सेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी सडेतोड प्रत्युत्तर देत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगामी कार्यक्रमावरच निशाणा साधला आहे. नागपुरात रेशीमबाग मैदानावर ३० हजार युवकांशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेला देवेंद्र फडणवीस यांचा ‘जेन झी’ संवाद हा पूर्णपणे पेड इव्हेंट आहे, असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या पुण्यातील कार्यक्रमात पैसे देऊन गर्दी जमवली जात असल्याचा आणि त्यांचे राजकीय रिऑन्चिंग केले जात असल्याचा दावा भाजपने केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने वंदे मातरमचे सामूहिक गायनही केले. या कार्यक्रमावरून काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी काँग्रेसच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
दुसऱ्या बाजूला, नागपुरातील रेशीमबाग मैदानावर ३० हजार तरुण-तरुणींशी संवाद साधणारे देवेंद्र फडणवीस हे ‘युवकांचे आयकॉन’ असल्याचा दावा भाजप नेते व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मात्र, संजय राऊत यांनी यावर सडकून टीका करत हा कार्यक्रम म्हणजे केवळ पैसे देऊन आयोजित केलेला एक दिखावा असल्याचा पलटवार केला आहे.
पुण्यातील राड्यानंतर आता नागपूरच्या रेशीमबाग मैदानातील या संवाद कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, दोन्ही पक्षांमधील हा वाद आगामी काळात आणखी चिघळण्याची चिन्हं आहेत.








