व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Eknath Shinde : जेंझी मतदारांवर एकनाथ शिंदेंचे लक्ष !

Eknath Shinde : जेंझी मतदारांवर एकनाथ शिंदेंचे लक्ष !

eknath-shinde-shivsena-gen-z-voters-strategy-after-student-protest : विद्यार्थी आंदोलनानंतर शिवसेना अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mumbai : दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात तरुण, विशेषतः जेंझी पिढी सहभागी झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी युवा मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्ष अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याची माहिती समोर येत आहे.
पक्षाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, २०२९ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जेंझी मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेना स्वतंत्र नियोजन करत आहे. आगामी काळात देशात सुमारे ३८ कोटी जेंझी मतदार असतील, असा अंदाज व्यक्त केला जात असून या मतदारवर्गाची राजकीय ताकद लक्षात घेऊन पक्षाने विशेष कृती आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे.

यासाठी लवकरच पक्षाची महत्त्वाची बैठक बोलावली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. जेंझी मतदारांचे नेतृत्व करू शकतील अशा नव्या आणि तरुण चेहऱ्यांचा शोध घेण्यावर पक्षाचा भर असणार आहे. पक्षातील नेत्यांच्या युवा पिढीसह विविध सामाजिक संघटनांमध्ये सक्रिय असलेल्या तरुण कार्यकर्त्यांना पुढे आणण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

NEET PG new rules: नीटमध्ये मोठे बदल; एकाच सत्रात परीक्षा !

शहरी आणि ग्रामीण भागातील तरुण मतदारांना एकत्र आणण्यासाठी विशेष मेळावे आणि संवाद कार्यक्रम आयोजित करण्याचाही पक्षांतर्गत विचार सुरू आहे. तरुणांच्या रोजगार, शिक्षण, कौशल्य विकास आणि सामाजिक प्रश्नांवर आतापासूनच काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दिल्लीतील जंतर-मंतर येथे नुकत्याच झालेल्या विद्यार्थी आंदोलनात मोठ्या प्रमाणात युवक सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे देशभरात शिक्षण व्यवस्था, परीक्षा पद्धती आणि युवकांच्या प्रश्नांवर चर्चा सुरू झाली. गेल्या काही वर्षांत तरुणांचा राजकीय सहभाग वाढत असल्याचे चित्र दिसून येत असून आगामी निवडणुकांमध्ये जेंझी मतदार निर्णायक भूमिका बजावू शकतात, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Bawankule reaction : फडणवीस दिल्लीला जाणार ‘या वावड्यांवर विश्वास ठेवू नका’

२०२९ मध्ये देशात लोकसभा निवडणुका तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे युवा मतदार कोणत्या पक्षाच्या बाजूने उभे राहतात, यावर राजकीय समीकरणे अवलंबून राहू शकतात. याच पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेसह इतर पक्षांनीही युवकांशी संवाद वाढवण्यावर भर दिला आहे.
दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून युवा मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न वाढले आहेत. शिक्षण, रोजगार, स्पर्धा परीक्षा आणि करिअरशी संबंधित मुद्द्यांवर तरुणांची भूमिका अधिक प्रभावी होत असल्याने राजकीय पक्षांनीही त्यानुसार आपली रणनीती बदलण्यास सुरुवात केली आहे.
विद्यार्थी आंदोलनानंतर देशभरात युवकांच्या प्रश्नांवर नव्याने चर्चा सुरू झाली असून आगामी काळात हा मतदारवर्ग राजकीयदृष्ट्या किती प्रभावी ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!