Congress councillor from Achalpur booked for using a mobile phone inside a polling station : मतदान केंद्रात मोबाईल वापरल्यामुळे अधिकाऱ्यांनी केली तक्रार
Amravati अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रात मोबाईल बाळगून त्याचा वापर केल्याप्रकरणी अचलपूर येथील काँग्रेस नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली.
मतदान केंद्राध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी (एसडीओ) बळवंतराव अरखराव यांनी दिलेल्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवला. अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. अचलपूर व चांदूरबाजार येथील एकूण ६९ मतदारांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत मतदान केंद्र उभारण्यात आले होते.
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मतदान केंद्रात मोबाईल फोन किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण नेण्यास व वापरण्यास मनाई आहे. मात्र, अचलपूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १३-बचे काँग्रेस नगरसेवक मोहम्मद सईद मोहम्मद सादिक यांनी मोबाईलसह मतदान कक्षात प्रवेश केल्याचे आढळून आले. सकाळी सुमारे ९ वाजता मतदान करताना त्यांनी मोबाईलचा वापर केल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
घटनेची गंभीर दखल घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तात्काळ परतवाडा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मोहम्मद सईद मोहम्मद सादिक यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २२३ तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियमाच्या कलम १२८ व १३२ अंतर्गत गुन्हा नोंदवला. ठाणेदार सुरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.








