congress’s annadata sangharsh padyatra for farmers : कर्जमाफीच्या मुदतीतच पदयात्रा; शेतकऱ्यांमध्ये संभ्रम
Buldhana जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या प्रश्नांसाठी काँग्रेसकडून ‘अन्नदाता संघर्ष पदयात्रा’ काढण्यात येणार असून, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमुळे या उपक्रमाला राजकीय रंग चढला आहे. कर्जमाफी, हमीभाव आणि वाढत्या महागाईसारख्या ज्वलंत मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न या पदयात्रेतून होणार असला, तरी गावपातळीवर शेतकऱ्यांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
सरकारकडून कर्जमाफीसाठी ३० जूनपर्यंतची मुदत जाहीर करण्यात आलेली असताना, या कालावधीतच पदयात्रा काढण्यामागील उद्दिष्ट काय, असा प्रश्न अनेक शेतकरी उपस्थित करत आहेत. काहींच्या मते, प्रत्यक्ष दिलासा मिळण्यापेक्षा आंदोलनात्मक कार्यक्रमांवर अधिक भर दिला जातो, हीच जुनी पद्धत पुन्हा दिसत आहे. हमीभावाचा मुद्दा देखील दरवर्षी आंदोलनापुरताच मर्यादित राहतो, अशी टीका शेतकरी वर्गातून होत आहे.
Bacchu Kadu : धनुष्यबाण हाती घेतल्यावर बच्चू कडूंचे ‘टार्गेट’ कोण?
पदयात्रा ही लोकशाही पद्धतीने प्रश्न मांडण्याचे प्रभावी माध्यम मानली जाते. मात्र, अशा उपक्रमांनंतर प्रत्यक्ष धोरणात्मक बदल होतात का, हा खरा मुद्दा आहे. अनेक वेळा मोठ्या घोषणा, आश्वासने आणि आंदोलनांचा गजर होतो; परंतु शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाययोजना दिसून येत नाहीत, अशी भावना ग्रामीण भागात वाढत आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी येत आहेत. त्यामुळे विविध पक्षांकडून आंदोलन, पदयात्रा आणि सभांद्वारे जनतेपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या सगळ्यात ‘अन्नदाता’ हा केवळ घोषणांचा चेहरा बनत नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांची अपेक्षा स्पष्ट आहे, त्यांना आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष दिलासा हवा आहे. कर्जमाफीची अंमलबजावणी, हमीभावाची हमी आणि शेतीखर्चावर नियंत्रण यांसारख्या मुद्द्यांवर ठोस निर्णय झाल्यासच या पदयात्रेचा खरा परिणाम दिसून येईल. अन्यथा, ही मोहीम केवळ राजकीय उपस्थिती दाखवण्यापुरती मर्यादित राहील, अशी भीती व्यक्त होत आहे.
आता लक्ष लागले आहे ते या पदयात्रेनंतरच्या कृतीकडे. घोषणांपलीकडे जाऊन शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवणारे निर्णय घेतले जातात का, की पुन्हा एकदा अन्नदाता आश्वासनांच्या प्रतीक्षेतच राहतो, हेच आगामी काळात स्पष्ट होणार आहे.








