Focus on the political rehabilitation of four leaders in Akola : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी चौघांच्या भूमिकेकडे लक्ष
Akola निवडणुकीच्या रणांगणात हार-जीत होतच असते; पण पराभवानंतर नेत्यांचे राजकीय पुनर्वसन कसे होते, याची चर्चा मात्र अकोल्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगतेय. सध्या चार नावांभोवती ही कुजबुज अधिक ऐकू येतेय.
पहिले माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, दुसरे लोकसभा निवडणुकीनंतर चर्चेत आलेले डॉ. अभय पाटील, तिसरे म्हणजे पदवीधर मतदारसंघातून दोनदा विधान परिषदेत गेलेले डॉ. रणजित पाटील आणि चौथे म्हणजे दोनदा आमदार राहिलेले बळीराम सिरस्कार. गव्हाणकरांनी विधानसभा असो की लोकसभा, मैदान सोडलेले नाही. मात्र, निवडणुकीच्या निकालाने त्यांच्या राजकीय वाटचालीला सध्या ‘थांबा’ मिळाल्याचे चित्र आहे. त्यामुळे पक्षाच्या ‘दरबारात’ पुढची हाक कधी येते, याकडे समर्थकांचे लक्ष.
डॉ. अभय पाटील लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले; पण निवडणुकीने त्यांना राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आणले. आता पराभवाची ‘बेरीज-वजाबाकी’ करून पक्ष त्यांना कोणती जबाबदारी देतो, याची उत्सुकता आहे.
डॉ. रणजीत पाटील यांचे विधान परिषदेतले दोन टर्मचे राजकारण संपले असले तरी अनुभव संपलेला नाही. त्यामुळे ‘पराभव म्हणजे पूर्णविराम की स्वल्पविराम?’ हा प्रश्न त्यांच्या बाबतीत विचारला जातोय.
बळीराम सिरस्कारांचा प्रवास तर वेगळाच! पक्षबदलांच्या राजकारणातून अखेर भाजपमध्ये परतलेले सिरस्कार आता ‘पुनर्वसनाच्या पायरीवर’ उभे आहेत. एकूणच, निवडणुकीत पराभूत झालेले हे चेहरे आता सत्तेच्या पटावर कोणत्या चौकटीत बसवले जातात, याचीच खरी उत्सुकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना या चारही नावांची राजकीय ‘चाल’ पुन्हा चर्चेत आली आहे. कानोकानी एकच सवाल—तिकीट नाही मिळाले तर पद, पद नाही तर महामंडळ; पण पुनर्वसन होणार कसे?








