manoj-jarange-patil-mumbai-morcha-50-people-permission-police-application : दुपारपर्यंत निर्णय न झाल्यास न्यायालयात जाणार!
Mumbai : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई दौऱ्याचा आणि आंदोलनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. जरांगे यांच्या उपोषणाचा आज १८वा दिवस असून, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ते काही मोजक्या समर्थकांसह अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. दरम्यान, मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावरील आंदोलनाला यापूर्वी दोन वेळा परवानगी नाकारल्यानंतर आता जरांगे यांच्या वतीने तिसऱ्यांदा अर्ज करण्यात आला आहे.
या नव्या अर्जातून केवळ ५० जणांना आंदोलन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांनी घालून दिलेल्या सर्व नियम व अटींचे काटेकोरपणे पालन केले जाईल. तसेच १८ सप्टेंबर रोजी पोलिसांनी निश्चित केलेल्या वेळेतच आंदोलन करण्यात येईल, असेही अर्जात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे यावेळी मर्यादित संख्येतील आंदोलकांच्या माध्यमातून आंदोलन करण्याची भूमिका जरांगे पाटील यांनी घेतल्याचे दिसून येत आहे.
Upi Transactions : यूपीआयच्या ₹२,००० पेक्षा मोठ्या व्यवहारांवर शुल्क लागणार!
दरम्यान, आज दुपारपर्यंत मुंबई पोलिसांकडून नव्या अर्जावर निर्णय न झाल्यास मनोज जरांगे पाटील न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत आहेत. आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी मिळाली नाही, तर उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची भूमिका त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केली आहे. मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारताना कायदा- सुव्यवस्था आणि वाहतुकीचा मुद्दा पुढे केला आहे. गेल्या वर्षीच्या आंदोलनावेळी दक्षिण मुंबईत सुमारे पाच हजार वाहने अनधिकृतपणे उभी राहिल्याने वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण आला होता. त्याचबरोबर गणेशोत्सव सुरू असल्याने मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे.
Disha Salian : दिशा सालियन प्रकरणात सहा वर्षांनी अखेर एफआयआर !
आझाद मैदानाची क्षमताही पोलिसांच्या भूमिकेतील महत्त्वाचा मुद्दा आहे. सुमारे सात हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या मैदानात नियमानुसार मर्यादित संख्येनेच आंदोलकांना सामावून घेता येते. मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झाल्यास दक्षिण मुंबईतील वाहतूक, रुग्णालये, न्यायालये आणि महत्त्वाच्या आर्थिक केंद्रांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आता जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या अर्जावर मुंबई पोलीस काय निर्णय घेतात आणि परवानगी नाकारल्यास न्यायालय कोणती भूमिका घेते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
_____








