Distribution of substandard rice and jowar through the ration system : स्वस्त धान्य दुकानदार संघटना आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन, कारवाईची मागणी
Buldhana जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमार्फत लाभार्थ्यांना वितरित होणारा तांदूळ अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून त्यात लाल दाणे व तब्बल ३० ते ४० टक्के चुरी आढळत आहे. याचबरोबर जिल्ह्यात खरेदी केलेल्या ज्वारीतही किड, तुट व निकृष्ट दर्जा असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटनेने जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश अंबुसकर यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, राज्य शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत भंडारा-गोंदिया जिल्ह्यात खरेदी झालेल्या धान्याच्या भरडाईनंतर तांदूळ राज्यभर वितरित केला जातो. मात्र, बुलढाणा जिल्ह्यासाठी मिळणारा तांदूळ क्वॉलिटी कंट्रोलच्या सर्व निकषांना हरताळ फासणारा आहे.
Khamgao APMC : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी श्रीकृष्ण टिकार!
निवेदनात असेही म्हटले आहे की, जिल्हा प्रतिनिधी, गोदाम व्यवस्थापक, निरीक्षण अधिकारी आणि जिल्हा पुरवठा कार्यालयातील काही कर्मचारी यांच्याकडून कामचुकारपणा व भ्रष्टाचार होत असून, मिलर्सकडून खराब माल स्वीकारून तो जिल्ह्यात पाठविला जात आहे.
तक्रारी असूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने स्वस्त धान्य दुकानदारांवर कार्डधारकांकडून ताण येत असल्याचेही निवेदनात नमूद आहे. डिसेंबर महिन्यात निकृष्ट तांदूळ स्वीकारणार नसल्याचा इशाराही दुकानदारांनी दिला आहे.
Local Body Elections : दोन उपमुख्यमंत्र्यांच्या पाच सभा; बुलढाण्यातील राजकारण तापले!
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जिल्हा पणन अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात सांगितले की, रब्बी-उन्हाळी २०२४-२५ हंगामात जिल्ह्यात ५,२५,३२९ क्विंटल ज्वारीची खरेदी झाली आहे. सोलापूर, अहिल्यानगर, पुणे आदी जिल्ह्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील ज्वारी निकृष्ट, किडलेली व खाण्यास अयोग्य असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. शासन निर्णयानुसार खराब ज्वारीसाठी अभिकर्ता पूर्णतः जबाबदार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील सर्व शासकीय गोदामांतील ज्वारीची तपासणी करून जेथे निकृष्ट ज्वारी साठवली आहे, ती तात्काळ बदलून द्यावी, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
Eknath Shinde : कुणीही ‘लाल’ आला तरी ‘लाडकी’ योजना बंद होणार नाही
काही गोदामांमध्ये ज्वारीत पीठ, सोडे, किड असल्याचे आढळले. संग्रामपूर शासकीय गोदामात आलेला निकृष्ट तांदूळ दुकानदारांनी परत पाठविल्याचेही निवेदनात नमूद. जिल्ह्यातील लाभार्थी मोठ्या प्रमाणात तक्रारी करीत आहेत.
सर्व शासकीय गोदामांतील तांदूळ व ज्वारीची तात्काळ चौकशी करण्यात यावी. निकृष्ट धान्यावर त्वरीत कारवाई करून चांगल्या प्रतीचे धान्य वाटपासाठी उपलब्ध करावे. दोषी अधिकाऱ्यांवर आणि संबंधित मिलर्सवर कडक कारवाई करावी.








