सर्पदंशात तीन मुलींचा मृत्यू, सोनसरी आश्रमशाळेत विद्यार्थिनीची आत्महत्या; जबाबदारीवरून राजकीय वर्तुळात चर्चा
Gadchiroli : आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. थिनोरा तालुक्यातील जपतलाई येथे सर्पदंशामुळे तीन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कुरखेडा तालुक्यातील सोनसरी शासकीय आश्रमशाळेत एका आदिवासी विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली. दोन्ही घटनांचे स्वरूप वेगवेगळे असले, तरी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा परिस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीबाबत मंत्री अशोक उईके यांनी घेतलेल्या भूमिकेवरूनही चर्चा सुरू झाली आहे.
जपतलाई येथील घटनेत सहा मुलींना सर्पदंश झाला, त्यापैकी तिघींना जीव गमवावा लागला. या घटनेने आश्रमशाळांमधील निवासव्यवस्था, परिसराची सुरक्षितता आणि आपत्कालीन उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले. दुसरीकडे, सोनसरी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या आत्महत्येमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्याकडे आणि त्यांच्या अडचणींकडे वेळेत लक्ष दिले जात होते का, याची चर्चा सुरू झाली आहे. या दोन्ही घटनांची कारणे वेगवेगळी असली, तरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या व्यवस्थेचे मूल्यमापन करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
जपतलाई प्रकरणात संस्थाचालकावर फौजदारी कारवाईचा बडगा उगारण्यात आला. मात्र, प्रकल्प अधिकारी अरुण एम. यांच्या संदर्भात मंत्री अशोक उईके यांनी यापुढे अशी घटना घडल्यास चौकशी केली जाईल, अशी भूमिका मांडल्याचे सांगितले जात आहे. या भूमिकेमुळे जबाबदारी निश्चित करण्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच चौकशीचा विचार करायचा का, की विद्यमान प्रकरणातील प्रशासकीय त्रुटींचीही तपासणी व्हायला हवी, असा मुद्दा चर्चेत आला आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी वाघमारेंचा अन्नत्याग;‘प्रहार’चा पाठिंबा, शिंदेसेनाही आक्रमक!
आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, नियमित तपासणी आणि तक्रारींचे वेळेत निराकरण महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे भविष्यात अशी घटना घडल्यास चौकशी करण्याच्या भूमिकेपेक्षा सध्याच्या घटनांमधील संभाव्य त्रुटींची निष्पक्ष तपासणी आणि जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. संस्थाचालक आणि प्रशासकीय यंत्रणेची जबाबदारी कोणत्या निकषांवर ठरवली जाणार, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे.
एकीकडे आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत असताना, दुसरीकडे चौकशीच्या निकषांवरून प्रश्न उपस्थित होणे प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरू शकते. जपतलाई आणि सोनसरी येथील घटनांची सखोल तपासणी, निष्कर्षांची पारदर्शकता आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना यांना आता महत्त्व प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी देण्यासाठी चौकशी दुर्घटनेनंतरच होणार, की संभाव्य धोके ओळखून आधीच जबाबदारी निश्चित केली जाणार? हा प्रश्न या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रस्थानी आला आहे.








