rohit-pawar-health-concern-family-emotional-hunger-strike-pandharpur-farmer-loan-waiver : शेतकरी कर्जमाफीवरील जाचक अटी रद्द करण्याची मागणी सलाईनलाही दिला नकार
pandharpur : शेतकरी कर्जमाफीवरील जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा रविवारी तिसरा दिवस होता. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आल्यानंतर आंदोलनस्थळी भावनिक वातावरण निर्माण झाले. आई-वडील, पत्नी आणि मुलांसह संपूर्ण कुटुंबीय आंदोलनस्थळी दाखल झाले होते. आपल्या मुलाची प्रकृती बिघडल्याचे पाहून आई सुनंदा पवार भावूक झाल्या, तर वडिलांची अवस्था पाहून मुलांच्या डोळ्यांतही अश्रू तरळल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान रोहित पवार यांची नियमित वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीत त्यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे वैद्यकीय पथकाने त्यांना तातडीने सलाईन आणि आवश्यक वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला दिला. ऑक्सिजन, पल्स रेट मॉनिटर आणि इतर वैद्यकीय सुविधा आंदोलनस्थळी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेपर्यंत सलाईन किंवा ओआरएस घेणार नसल्याची भूमिका रोहित पवार यांनी कायम ठेवली.
Nashik mlc election : गोकुळ गीते माघारीनंतरही महायुती सतर्क; नाशिकचे नगरसेवक थेट रिसॉर्टमध्ये
दरम्यान, आंदोलनस्थळी पोहोचलेल्या आई सुनंदा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना मुलाचा अभिमान असल्याचे सांगितले. घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नसताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रोहित पवार गेल्या तीन दिवसांपासून अन्नाचा कणही न घेता संघर्ष करत असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आणि कर्जमाफीतील अडथळे दूर करण्यासाठी तो शासनाशी लढत असल्याचे सांगताना त्या भावूक झाल्या.
रोहित पवार यांची प्रकृती खालावत असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर पत्नी कुंती पवार आणि त्यांची दोन्ही मुलेही तातडीने आंदोलनस्थळी पोहोचली. यावेळी वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पाहून मुलांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. कुटुंबीयांसह उपस्थित कार्यकर्त्यांनाही हा प्रसंग भावूक करून गेला.
आंदोलनाच्या ठिकाणी विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, आमदार आणि खासदार सातत्याने भेट देत आहेत. दुसरीकडे, काही विरोधी पक्षांकडून या आंदोलनावर टीकाही केली जात आहे. मात्र, रोहित पवार यांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील एका अटीवरून हा संघर्ष सुरू झाला आहे. सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली असली तरी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम एकरकमी भरल्यानंतरच कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची अट ठेवण्यात आली आहे. याच अटीला रोहित पवार यांनी विरोध दर्शविला असून ही कर्जमाफी नसून शेतकऱ्यांकडून वसुली करण्याचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
शेतकऱ्यांना कोणत्याही अतिरिक्त अटींशिवाय सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळावी, अशी त्यांची मागणी आहे. सरकारने ही अट तातडीने रद्द करावी, यासाठीच त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Ubt matoshree meeting : मातोश्रीवरील बैठकीत सर्व ९ खासदार सहभागी !
प्रकृती खालावल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क झाल्याची माहितीही रोहित पवार यांनी दिली. सरकारचे प्रतिनिधी आंदोलनस्थळी येऊन चर्चा करेपर्यंत आपण ओआरएस किंवा सलाईन घेणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. सरकारकडून ठोस आश्वासन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आंदोलनाचा तिसरा दिवस संपत असताना रोहित पवार यांच्या प्रकृतीबाबतची चिंता वाढली असून कुटुंबीयांसह समर्थक आणि शेतकरी वर्गाचे लक्ष आता सरकारच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे.








