rohit-pawar-withdraws-hunger-strike-after-assurance-from-girish-mahajan-on-farm-loan-waiver-issue : मंत्री गिरीश महाजनांच्या मध्यस्थीने चर्चेचा मार्ग मोकळा
Pandharpur : शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसह विविध कृषीविषयक मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन अखेर तिसऱ्या दिवशी मागे घेतले. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आणि राज्य सरकारकडून सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर रोहित पवार यांनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतील अटी रद्द कराव्यात, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक आर्थिक प्रोत्साहन द्यावे तसेच सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली होती. आंदोलनादरम्यान राज्य सरकारकडून चर्चेसाठी पुढाकार घेण्यात आला असून २२ जूनपूर्वी मुंबईत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली.
रोहित पवार यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेसाठी बोलावले असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे. सध्या जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेतील अनेक अटींमुळे मोठ्या संख्येने शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अटींचा पुनर्विचार करून व्यापक स्वरूपात कर्जमाफी लागू करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी रोहित पवार यांनी सरकारने कर्जमाफी योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिल्याबद्दल स्वागत केले. मात्र, योजनेतील पात्रतेच्या निकषांमुळे अनेक शेतकरी वगळले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. २०१९ मधील महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही नव्या योजनेत समाविष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणारी ५० हजार रुपयांची प्रोत्साहन रक्कम वाढविण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
आंदोलन मागे घेत असतानाच रोहित पवार यांनी शेतकरी प्रश्नांवर संघर्ष कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ४ जुलै रोजी मोठे आंदोलन उभारण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या लढ्यात विविध शेतकरी संघटनांचे नेते आणि विरोधी पक्षांतील प्रमुख नेते सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Rohit pawar : रोहित पवारांच्या प्रकृतीची चिंता वाढली; आई-वडील, पत्नी आणि मुलांचे अश्रू अनावर,
दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सकारात्मक असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, कर्जमाफी संदर्भातील मागण्यांवर सविस्तर चर्चा केली जाईल. सध्या सुमारे ३७ हजार कोटी रुपयांच्या आर्थिक भाराची कर्जमाफी योजना राबविण्यात येत असून, यामध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत सरकार विचार करू शकते. मुख्यमंत्री स्तरावर बैठक घेऊन योग्य निर्णय केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाजन यांनी असेही नमूद केले की, कर्जमाफीतील काही बाबींवर शेतकरी आणि लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेतल्या जातील. जर योजनेतील अटींमुळे अन्याय होत असल्याचे निदर्शनास आले, तर त्यावर चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल.
रोहित पवार यांनी यावेळी आगामी हंगामाबाबतही चिंता व्यक्त केली. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असल्याने शेतीपिकांना मोठा फटका बसू शकतो, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे कोणत्याही कठोर अटींशिवाय कर्जमाफी लागू करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय पूर्वी लागू असलेली एक रुपयांत पीक विमा योजना पुन्हा सुरू करण्याची मागणीही त्यांनी सरकारकडे केली.
Nashik mlc election : गोकुळ गीते माघारीनंतरही महायुती सतर्क; नाशिकचे नगरसेवक थेट रिसॉर्टमध्ये
सरकारसोबत होणाऱ्या बैठकीत शेतकरी संघटनांचे नेते राजू शेट्टी, रविकांत तुपकर, डॉ. अजित नवले, जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह विविध प्रतिनिधी सहभागी होणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. त्यामुळे आगामी बैठकीत शेतकरी कर्जमाफी, पीक विमा आणि कृषी धोरणांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.








