व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Hidayat Patel : काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची मशिदीबाहेर हत्या

Hidayat Patel : काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची मशिदीबाहेर हत्या

Cases against five people including NCP Ajit Pawar group district president : राष्ट्रवादी अजित पवार गट जिल्हाध्यक्षासह पाच जणांवर गुन्हे

Akola : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर अकोट तालुक्यातील मोहाळा गावात झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने अकोला जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी दुपारी नमाजनंतर मशिदीतून बाहेर पडत असताना धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, हिदायत पटेल यांच्या मृत्यूनंतर खुनाची कलमे वाढवली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहाळा गावातील मशिदीत दुपारच्या नमाजनंतर बाहेर पडताच उबेद पटेल या तरुणाने हिदायत पटेल यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या पोटावर आणि मानेवर गंभीर वार करण्यात आले. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना तत्काळ अकोट येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

Shweta Mahale : ‘चूक खपवून घेतली जाणार नाही’, शुभारंभालाच आमदारांचा इशारा

या घटनेनंतर राजकीय आणि कौटुंबिक वादातून कट रचून हल्ला करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पटेल कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रूजम्मा, अकोटचे माजी काँग्रेस नगराध्यक्ष संजय बोडखे, काँग्रेसचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती राजीव बोचे यांच्यासह हल्लेखोर उबेद पटेल आणि आणखी एका आरोपीचा समावेश आहे.

हल्ल्यानंतर फरार झालेल्या उबेद पटेलला अकोट तालुक्यातील पणज गावातील नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. सुरुवातीला खुनाचा प्रयत्न आणि कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता हिदायत पटेल यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणात खुनाची कलमे वाढवली जाण्याची शक्यता असून, तपासाची दिशा त्याकडे वळली आहे.

हिदायत पटेल हे अकोल्यातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख मुस्लिम चेहरे मानले जात होते. ते सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी केली होती. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात त्यांचे मोठे वजन होते. ते गेली 25 वर्षे जिल्हा बँकेचे संचालक होते, तसेच अकोट तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. अकोट बाजार समितीचे ते अनेक वर्षे सभापती राहिले होते.

Ladki Bahin Yojana : ई-केवायसी करताना घाईघाईत निवडला चुकीचा पर्याय

या हत्येप्रकरणात मोठ्या राजकीय नेत्यांची नावे समोर आल्याने अकोला जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. आता तपासात कोणावर खुनाचा गुन्हा दाखल होतो आणि या कटामागचे नेमके सूत्रधार कोण, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!