व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Hindu rashtra samiti : ‘आज मनुस्मृती जाळली, उद्या काय जळणार?’; मनुस्मृती जाळल्याप्रकरणी...

Hindu rashtra samiti : ‘आज मनुस्मृती जाळली, उद्या काय जळणार?’; मनुस्मृती जाळल्याप्रकरणी अकोल्यात तक्रार

Complaint filed in Akola over the burning of the Manusmriti : दादरमधील घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची हिंदू राष्ट्र समन्वय समितीची मागणी

Akola मुंबईतील दादर येथे आंदोलनादरम्यान मनुस्मृतीच्या प्रती जाळल्याच्या घटनेचा निषेध करीत हिंदू जनजागृती समिती आणि विविध समविचारी संघटनांच्या वतीने अकोला येथील खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, दादर येथे ३१ ऑगस्ट २०२६ रोजी राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनादरम्यान मनुस्मृतीच्या प्रती जाळण्यात आल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. या घटनेशी संबंधित फोटो आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

राजकीय विरोधासाठी धर्मग्रंथ जाळणे योग्य का?

एखाद्या राजकीय किंवा सामाजिक भूमिकेला विरोध करण्यासाठी आंदोलन करणे हा लोकशाही अधिकार आहे. मात्र, विरोध व्यक्त करण्यासाठी एखाद्या धर्मग्रंथाला लक्ष्य करून तो जाळण्याची कृती धार्मिक भावना दुखावणारी ठरू शकते, असा मुद्दा समितीच्या वतीने उपस्थित करण्यात आला.

“आज मनुस्मृती जाळून राजकीय विरोध व्यक्त करण्याचे समर्थन केले, तर भविष्यात इतर धर्मांच्या पवित्र ग्रंथांबाबतही अशीच भूमिका घेतली जाऊ शकते का?” असा प्रश्न उपस्थित करीत अशा घटनांमुळे सामाजिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेसमोर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता समितीने व्यक्त केली.

Sajid Khan Pathan : आमदार साजिद खान यांचे कोंडवाड्यात जाऊन गोवंशांचे पूजन, पुरणपोळी-चारा देत केली सुटका

कायद्याची कसोटी सर्वांसाठी समान असावी

धार्मिक भावना दुखावणे किंवा विविध समाजघटकांमध्ये तेढ निर्माण होण्यास कारणीभूत ठरू शकणाऱ्या कृतींची भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ मधील संबंधित तरतुदींनुसार निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दादर येथील घटनेशी संबंधित फोटो, व्हिडीओ आणि अन्य इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची तपासणी करून आयोजक, सहभागी आणि अन्य संबंधितांची भूमिका तपासावी तसेच कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, असे तक्रारीत म्हटले आहे.

Rohit Pawar: एसआयटी म्हणजे सरकारचा इंटरेस्टेड टाईमपास; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर रोहित पवारांचा घणाघात

तक्रार स्वीकारली

हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे श्रीराम पांडे यांनी तक्रार दाखल केली. यावेळी भाजपच्या नगरसेविका चंदा शर्मा, भाजप महिला मोर्चाच्या सचिव चंदा ठाकूर, विश्व हिंदू परिषदेचे अकोला जिल्हाध्यक्ष राजू मंजुळकर, शिवसेनेच्या कायदे विभागाचे जिल्हाध्यक्ष अॅड. पवनेश अग्रवाल, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे धनंजय मेहसरे, हिंदू जनजागृती समितीचे अमोल वानखडे, अश्विनी सरोदे, सतीश सरोदे तसेच राष्ट्रभक्त अधिवक्ता समितीच्या श्रुती भट उपस्थित होत्या.

खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांनी तक्रार स्वीकारली. प्रकरणाचा अभ्यास करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

error: Content is protected !!