Local Body Elections : नामांकन दारात, इच्छुक गोंधळात! गुप्त बैठका वाढल्या

Possibility of Rebellion in Mahayuti and MVA Alliances : महायुती-आघाडीची वाढली डोकेदुखी; बंडखोरीचीही चर्चा

Buldhana पालिका निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची मुदत हाताच्या अंतरावर आली असतानाही जिल्ह्यातील कोणत्याही राजकीय पक्षाने प्रभागनिहाय उमेदवारांची अंतिम यादी निश्चित केलेली नाही. नगराध्यक्षपदासाठीचे दावेदार अजूनही गोंधळात असून, प्रत्येक पक्षात “तिकीट कोणाला?” यावरून अंतर्गत राजकारण तापले आहे.

जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांपैकी बुलढाणा आणि चिखली येथे राजकीय तापमान सर्वाधिक चढले आहे. गेल्या महिनाभरात भाजप आणि शिंदेसेना यांच्यातील सूर तीव्र झाले असून, आरोप-प्रत्यारोप, पक्षप्रवेश आणि नाराजीमुळे महायुतीतील एकोप्याला तडा गेला आहे. बुलढाण्यात झालेल्या आ. चैनसुख संचेती यांच्या बैठकीनंतर शिंदेसेनेत अस्वस्थता वाढली. त्यानंतर आ. संजय गायकवाड यांनी चिखलीत बैठक घेऊन “स्वबळावर लढायची तयारी ठेवा” असा थेट संदेश दिल्याचे सांगितले जाते.

नगराध्यक्षपदावरून सुरू असलेली दोलायमान स्थिती अद्याप कायम आहे. काही शिंदेसेना नेत्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पर्यंत “सांगावा” पोहोचवल्याची चर्चा आहे. जरी महायुतीतील नेते “सगळं आलबेल” असल्याचा दावा करत असले तरी नाराजीमुळे समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Devendra Fadnavis : ‘नगराध्यक्ष आपल्याच पक्षाचा हवा’, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

काँग्रेस पक्षात काही ठिकाणी उमेदवारांची नावे निश्चित झाली असली तरी अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हाती आहे. ते सध्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, स्थानिक गटबाजी आणि तालुकानिहाय आढावा घेत आहेत. नागपूर बैठकीत त्यांनी काही निर्णयांवर असंतोष दर्शवला होता. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यानंतर काँग्रेसच्या उमेदवारी यादीत फेरबदल होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी आणि महायुती — दोन्हीकडेच सध्या तणावाचं वातावरण आहे. महायुतीत नाराजीचा धूर, तर आघाडीत गुप्त बैठकींचं रणकंदन! कोणाला तिकीट मिळणार या प्रश्नाने दोन्ही आघाड्यांतील नेते आणि कार्यकर्त्यांची झोप उडाली आहे.

Local Body Elections : मनसे मैदानात उतरली! ताकदीने लढण्याचा निर्धार

शुक्रवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या जिल्हास्तरीय बैठकीत “ऐक्याचा नारा” दिला गेला असला तरी, अनेक प्रभागांवर उमेदवारांबाबत एकमत झालेले नाही. “झाकली मूठ सव्वा लाखाची” या भूमिकेतून आघाडी शांततेचा मुखवटा ठेवत असून, अंतिम रणनीती २१ नोव्हेंबरला (अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस) उघड करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याबाबतही चर्चा सुरू असल्याचे सूत्र सांगतात. त्यामुळे आघाडीतील काही “राजकीय पत्ते” हे थेट २१ नोव्हेंबरलाच उघड होण्याची शक्यता आहे.

Local Body Elections : ‘मलाच तिकीट द्या, निवडूनच येतो’, उमेदवारांच्या दाव्याने नेते हैराण

भाजपमध्ये नगराध्यक्ष पदासाठी तीन प्रमुख नावे चर्चेत आहेत. मात्र कोणत्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. सर्वेक्षण अहवाल, स्थानिक दबाव आणि गटबाजीमुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्र सांगतात. इच्छुक उमेदवार मात्र “फोनची वाट” पाहत आहेत. पालिका निवडणुकीच्या रणांगणात जिल्ह्याचा राजकीय पट सध्या धुसर आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही शिबिरात गोंधळ, तणाव आणि अस्वस्थतेची स्थिती आहे.