Local Body Elections : एकही आमदार नव्हता तेव्हा सात नगराध्यक्ष होते, आता…

Question mark over BJP’s report card in the municipal elections : नगरपालिका निवडणुकीतील भाजपच्या रिपोर्ट कार्डवर प्रश्नचिन्ह

Amravati जिल्ह्यातील दहा नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निकालांमध्ये एकूण १२ नगराध्यक्षपदांपैकी भाजपला ६, काँग्रेसला २, तर शिंदेसेना, उबाठा, प्रहार आणि अपक्ष प्रत्येकी १ नगराध्यक्षपद मिळाले. एकंदरीत हा निकाल भाजपसाठी धक्कादायक मानला जात आहे.

गत निवडणुकीत भाजपचा एकही आमदार नसताना ७ नगराध्यक्ष निवडून आले होते. मात्र यावेळी ग्रामीण भागात तब्बल ६ आमदार असतानाही भाजपला केवळ ६ नगराध्यक्षांवर समाधान मानावे लागले. एकहाती सत्ता मिळवण्यासाठी भाजपने अनेक ‘आयात’ नेते घेतले होते; मात्र मतदारांनी हा प्रयोग नाकारल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.

धामणगाव रेल्वे वगळता अन्य बहुतांश ठिकाणी भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. खासदार बळवंत वानखडे यांच्या ‘होम पिच’वरही निकाल भाजपच्या बाजूने लागला नाही. ही निवडणूक कार्यकर्त्यांची होती; मात्र नेत्यांकडून दुर्लक्ष झाल्याचे चित्र स्पष्ट झाले.

Sanjay Gaikwad : बुलढाणा नगरपरिषदेत शिवसेनेची एकहाती सत्ता

दर्यापूरचे आमदार गजानन लवटे यांचे चिरंजीव यश लवटे यांना अंजनगाव सुर्जी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागला. अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या अर्धांगिनी नलिनी भारसाकडे यांनाही दर्यापूरमधून पराभवाची नामुष्की ओढवली.

दर्यापूर व अंजनगाव सुर्जी येथे शिंदेसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानंतरही खाते उघडता न आल्याने पक्षांतर्गत चर्चांना उधाण आले आहे. ‘सब कुछ घर में’ ही भूमिका चालणार नाही, असा स्पष्ट संदेश कार्यकर्त्यांनी नेत्यांना दिल्याचे बोलले जात आहे.

केवलराम काळे, प्रवीण तायडे, उमेश यावलकर आणि प्रताप अडसड या आमदारांच्या मतदारसंघांत भाजप वर्चस्व सिद्ध करू शकली नाही. त्यामुळे या निवडणुकीत काही आमदार केवळ ‘वरपास’ झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Sanjay Rathor : शिंदे गटाच्या बैठकीत तणाव, खुर्च्या उगारल्या

काँग्रेससाठीही चिंतनाचा निकाल
नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांत काँग्रेसलाही फारसे यश मिळाले नाही. चिखलदरा आणि दर्यापूर या दोनच नगराध्यक्षपदांवर समाधान मानावे लागले. येत्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल काँग्रेस नेतृत्वासाठी आत्मपरीक्षणाची घंटा ठरला आहे. कार्यकर्ते टिकवण्याचे आव्हान काँग्रेसपुढे उभे ठाकले असून अन्यथा ‘आऊटगोईंग’ वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Local Body Elections : खामगाव नगरपरिषदेत भाजपाची ऐतिहासिक घोडदौड

चिखलदऱ्यात भाजपचा धक्का
चिखलदरा नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्रसिंह सोमवंशी यांनी ऐन निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि भाजपने त्यांना उमेदवारीही दिली होती. भाजप येथे सहज विजय मिळवेल, असे चित्र रंगविण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती बिनविरोध नगरसेवक झाले होते. आमदार रवी राणा यांच्या हालचालींमुळे दोन उमेदवारांनी माघारही घेतली होती. मात्र प्रत्यक्ष निकालाने भाजपच्या अपेक्षांना तडा दिला असून, सोमवंशी यांच्या ३३ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.