Tension at Shinde faction meeting : मंत्री संजय राठोड यांच्यासमोरच अकोल्यात पदाधिकारी आमनेसामने
Akola नगरपालिका निवडणुकीतील अपयशाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) अंतर्गत असलेले मतभेद रविवारी रात्री उघडपणे समोर आले. मंत्री तथा आमदार संजय राठोड यांच्या उपस्थितीत अकोल्यात आयोजित बैठकीदरम्यान पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपसात भिडल्याची धक्कादायक घटना घडली. वाद इतका विकोपाला गेला की काही कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या उगारल्याने एकच गोंधळ उडाला.
नगरपालिका निवडणुकीतील पराभवाचे खापर माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने हा वाद पेटल्याची माहिती आहे. जिल्हाप्रमुख अश्विन नवले समर्थकांकडून बाजोरिया यांच्यावर थेट आरोप करण्यात आले. याला बाजोरिया समर्थकांनी तीव्र विरोध करताच वातावरण तापले.
Local Body Elections : खामगाव नगरपरिषदेत भाजपाची ऐतिहासिक घोडदौड
रविवारी रात्री अकोला शहरातील एका हॉटेलमध्ये मंत्री संजय राठोड यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलावली होती. निवडणुकीतील अपयशाची कारणे, पुढील रणनीती आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी यावर चर्चा सुरू असताना अचानक आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. चर्चेदरम्यान उपजिल्हाप्रमुख योगेश अग्रवाल यांनी, “महानगरपालिका निवडणुकीत माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा हस्तक्षेप राहिला, तर शिवसेना (शिंदे गट) याची मोठी किंमत मोजावी लागेल,” असा आरोप केल्याने वाद चिघळला.
Lavasa scam : लवासा गैरव्यवहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
या वक्तव्यामुळे बाजोरिया समर्थक संतप्त झाले. दोन्ही गटांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांवर जोरदार शब्दांत टीका सुरू केली. काही क्षणांतच वाद हाताबाहेर गेला आणि खुर्च्या उगारण्यापर्यंत प्रकार पोहोचला. उपस्थितांनी मध्यस्थी करून परिस्थिती आवरण्याचा प्रयत्न केला.
या गोंधळामुळे मंत्री संजय राठोड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षाची बैठक अशा प्रकारे बिघडणे आणि सार्वजनिक ठिकाणी अनुशासनभंग होणे अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले. संघटनात्मक शिस्त पाळण्याचे आदेश देत त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना इशारा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या घटनेमुळे अकोला जिल्ह्यातील शिंदे गटातील अंतर्गत कलह पुन्हा एकदा उघड झाला असून, आगामी महानगरपालिका निवडणुकीपूर्वी पक्षासमोर संघटनात्मक आव्हान उभे ठाकल्याचे स्पष्ट झाले आहे.








