Unopposed election in the Chikhaldara Municipal Council : मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती विजयी
Amravati अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत मामेभाऊ आल्हाद कलोती हे बिनविरोध निवडून आले. या प्रक्रियेत आमदार रवी राणा यांनी पुढाकार घेतल्याचे समजते. यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोनवरून ही माहिती दिल्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
चिखलदरा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० (ब) मधून आल्हाद कलोती यांनी पहिल्यांदाच उमेदवारी दाखल केली होती. त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराने अखेर माघार घेतल्याने कलोती यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे या प्रभागातील निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात आली असून, कलोती अधिकृतरित्या विजयी घोषित झाले आहेत.
Local Body Elections : चिखलदऱ्यात फडणवीसांचे मामेभाऊ आल्हाद कलोती बिनविरोध !
पहिल्यांदाच निवडणुकीत उतरलेल्या आल्हाद कलोती यांच्या उमेदवारीमुळे चिखलदरा नगरपरिषद निवडणुकीकडे विशेष लक्ष होते. मात्र प्रतिस्पर्ध्यांनी माघार घेतल्याने ते सहजपणे बिनविरोध विजयी झाले. या विजयानंतर आमदार रवि राणा यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून “भाऊ, बिनविरोध झालं” अशी माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनीही कलोती आणि सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
Pune land scam : पार्थ पवारांच्या कंपनीचे व्यवहार अधिकच संशयास्पद !
दरम्यान, काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर तीव्र टीका केली. “भाजप ही रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या खुंट्याला बांधलेली आहे. चिखलदऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दमदाटी आणि गुंडागर्दी करत आहेत. मुख्यमंत्री पदाचा दुरुपयोग करून उमेदवारांना धमक्या व पैशांची आमिषे दाखवण्यात आली. त्यांचा डोळा तिथल्या जमिनीवर आहे,” असा आरोप ठाकूर यांनी केला.
तसेच, “संविधानाची उघड उघड पायदळणी करणारे फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात क्रूर मुख्यमंत्र्यांपैकी ओळखले जातील. भाजपमध्ये मूळ कार्यकर्ते कमी आणि भाड्याचे लोक जास्त आहेत. कलोती यांचा पराभव झाल्यास नाचक्की झाली असती, म्हणून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दबाव आणण्यात आला,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.








