Local body elections : काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षांवर भाजपला मदत केल्याचा आरोप

Congress State Vice-President accused of helping the BJP : अकोट पालिका निवडणुकीतील पराभवावरून काँग्रेसमध्ये खळबळ; प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार

Akola अकोट नगरपालिकेच्या निवडणुकीत आपला पराभव काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यामुळे झाल्याचा गंभीर आरोप करत, ते भाजपला मदत करणारे ‘स्लीपर सेल’ असल्याने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी नगराध्यक्षपदाच्या पराभूत उमेदवार अलका संजय बोडखे यांनी केली आहे. त्यांच्या या आरोपांमुळे काँग्रेसच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

अलका बोडखे यांनी २९ डिसेंबर रोजी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन लेखी तक्रार सादर केली आहे. अकोट पालिका निवडणुकीत हिदायत पटेल यांनी पक्षासाठी काम न करता जाणीवपूर्वक चुकीची रणनीती राबवली, तसेच नगरसेवक पदासाठी कमकुवत उमेदवार दिल्याने पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

नेत्यांच्या हेकेखोरपणामुळे पक्ष सोडतोय’, थेट आरोपाने राजकारणात खळबळ

उमेदवारीवरून सुरुवातीपासून नाराजी
तक्रारीत अलका बोडखे यांनी नमूद केले आहे की, नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळताच हिदायत पटेल यांनी सुरुवातीपासूनच नाराजी व्यक्त केली होती. पक्षाच्या दबावामुळे त्यांनी उमेदवारी स्वीकारल्याचा देखावा केला. नगरसेवक पदासाठी सात जणांची नावे सुचविण्यात आली होती; मात्र त्यापैकी केवळ दोन जणांनाच उमेदवारी देण्यात आली.
आघाडीची संधी जाणीवपूर्वक गमावल्याचा आरोप
शिवसेना (उबाठा) आणि प्रहार या दोन्ही पक्ष काँग्रेससोबत आघाडी करण्यास तयार असतानाही, हिदायत पटेल यांनी ही संधी हेतुपुरस्सर दुर्लक्षित केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे सुमारे ३ हजार मते घटल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Lonar Municipal council results काँग्रेसची ताकद वाढली; सीमा शिंदे गटनेतेपदी बिनविरोध

मुस्लीम मतांचे नुकसान झाल्याचा दावा
इतिहासात प्रथमच काँग्रेसला मुस्लीम समाजाची इतकी कमी मते मिळाल्याचा आरोप करत, मुस्लीमबहुल भागात आपले नुकसान व्हावे यासाठी जाणीवपूर्वक कमकुवत उमेदवार उभे करण्यात आल्याचे बोडखे यांनी म्हटले आहे. तक्रारीनुसार, मुस्लीम समाजाची सुमारे २२ हजार मते झाली असून त्यापैकी
एमआयएमला १०,६५७,
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ला ७,६०९,
अपक्ष मुस्लीम उमेदवाराला ५८१ मते मिळाली.
मात्र काँग्रेसला केवळ ३ हजार मते मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.
निलंबनाची मागणी
हिदायत पटेल हे सहकार गटाशी संबंधित असून या गटाचे भाजपशी लागेबांधे असल्याचा आरोप करत, सन २००४ मध्ये पक्षविरोधी कारवाईप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले होते, त्याच धर्तीवर यावेळीही त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी अलका संजय बोडखे यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.