Party workers allege that they are leaving the party due to the stubbornness of the leaders : भाजपला धक्का, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे राजीनामा सत्र
Buldhana भारतीय जनता पक्षात अंतर्गत अस्वस्थता वाढत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून, भाजपाचे जुने व सक्रिय कार्यकर्ते पद्मनाभ (सोनू) जगदेवराव बाहेकर, माजी नगरसेवक अरविंद पांडुरंग होंडे आणि शहर ओबीसी अध्यक्ष वैभव दिलीप इंगळे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे सादर केला आहे. याआधी उपजिल्हाध्यक्ष उदय देशपांडे यांनी राजीनामा दिल्यानंतर हा पक्षासाठी आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.
राजीनामा पत्रात तिघांनीही पक्षातील नेत्यांच्या हेकेखोर वृत्ती, असमन्वय व कार्यकर्त्यांकडे होणारे दुर्लक्ष यावर गंभीर आरोप केले आहेत.
२००२ पासूनची निष्ठा, तरीही डावलल्याचा आरोप
पद्मनाभ उर्फ सोनू बाहेकर हे सन २००२ पासून भाजपचे प्राथमिक व क्रियाशील सदस्य असून २०२५ पर्यंत पक्षाने त्यांच्यावर विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. भाजयुमो विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष, सरचिटणीस अशी अनेक पदे त्यांनी यशस्वीपणे सांभाळली.
सन २०१४ पासून बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक १८९ व १९० चे बूथ प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केले. पक्षाच्या बैठका, मेळावे, आंदोलने व मोर्चांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून काही आंदोलनांदरम्यान त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत.
Lonar Municipal council results काँग्रेसची ताकद वाढली; सीमा शिंदे गटनेतेपदी बिनविरोध
मात्र, नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या प्रभागातून उमेदवारीचा दावा करूनही इतर पक्षातून आलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात आल्याने आपण व्यथित झालो, असा आरोप त्यांनी केला आहे. दुसऱ्या प्रभागात तयारी करूनही तेथेही काँग्रेसमधून आलेल्या उमेदवाराला संधी दिल्याने आपली उपेक्षा झाल्याचे त्यांनी नमूद केले. परिणामी, त्यांनी प्राथमिक सदस्यत्वासह बूथ प्रमुख पदाचाही राजीनामा दिला आहे.
‘असमन्वयामुळेच पक्षाचा पराभव’
माजी नगरसेवक अरविंद होंडे हे गेल्या २० वर्षांपासून भाजपचे सदस्य असून त्यांनी शहर सरचिटणीस, नगरसेवक व गटनेता म्हणून काम केले आहे. त्यांच्या मते, शहर भाजपमधील अंतर्गत असमन्वय व वैचारिक मतभेदांमुळेच डिसेंबर २०२५ मधील नगरपरिषद निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाला. नेत्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ओबीसी नेतृत्वही नाराज
शहर ओबीसी अध्यक्ष व जिल्हा सहयोजक असलेले वैभव इंगळे यांनीही याच कारणांवर शिक्कामोर्तब केले आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजी, हेकेखोर नेतृत्व व कार्यकर्त्यांचे खच्चीकरण यामुळे भाजपची संघटनात्मक ताकद कमजोर होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
Akola municipal corporation election : १६४ उमेदवारांची माघार; ४६९ आजमावणार नशीब
भाजपसाठी इशारा?
एकामागून एक होत असलेले राजीनामे पाहता, बुलढाणा जिल्ह्यात भाजपच्या संघटनात्मक स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील पराभवानंतर आता नाराज कार्यकर्त्यांचे बाहेर पडणे पक्ष नेतृत्वासाठी गंभीर इशारा मानला जात आहे.








