Slow pace of nomination filing : अर्ज दाखल करण्याची संथ गती; तिकीट जाहीर होण्याआधीच गटबाजीचा ‘धसका’?
Buldhana जिल्ह्यातील ११ नगरपालिका निवडणुकीसाठी १० नोव्हेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असली, तरी पहिल्या चार दिवसांत अर्ज दाखल करण्याची गती अत्यंत संथ राहिली. १७ नोव्हेंबरची अंतिम मुदत जवळ येत असताना, आतापर्यंतचा कल पाहता पक्षांतर्गत गटबाजीचा मोठा प्रभाव उमेदवारांच्या निर्णयावर पडत असल्याचे स्पष्ट होत आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते मुंबईतच डेरा टाकून बसले आहेत. येथूनच जागावाटप, अंतर्गत वाद, आणि ‘ए’–‘बी’ फॉर्मचे राजकारण यावर अंतिम शिक्कामोर्तब केले जात आहे.
यामुळे इच्छुकांनी अर्ज भरला तर तिकीट दुसऱ्याला मिळेल का? या धास्तीने अनेकजण ‘वेट अॅण्ड वॉच’ च्या भूमिकेत राहिले आहेत. पक्षाने अधिकृत तिकीट देण्याआधीच अर्ज दाखल केल्यास तिकीट दुसऱ्याला मिळाले तर बंडखोरीचा धोका आहे. गटबाजी वाढण्याचीही भीती आहे. पक्षाचा अंतर्गत समतोल बिघडण्याचा धोका आहे. हे टाळण्यासाठीच वरिष्ठ नेते “अर्ज दाखल करण्याचा वेग मंद ठेवा” अशीच रणनीती राबवत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.
Local Body Elections : शिवसेनेचा (शिंदे) ‘पहिला’ उमेदवारी अर्ज दाखल
बुलढाणा, चिखली, खामगाव, शेगाव, मलकापूर, सिंदखेड राजा, जळगाव जामोद आदी पालिकांत अर्जांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी. महायुतीतील काही आमदारांचीही प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने निर्णय प्रक्रियेत कायम दिरंगाई दिसत आहे.
लोणार व मेहकर येथे शिवसेना (शिंदे) गटाने नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर केले असून त्यांनी अर्जही भरले आहेत. तरीही महायुतीत सर्व काही सुरळीत नसून स्थानिक पातळीवरील गटबाजी सुरूच आहे, असे राजकीय संकेत मिळत आहेत.
नेत्यांच्या अदृश्य हालचाली, तिकीटाचे गोंधळ आणि जिल्ह्यातील वाढती अनिश्चितता यामुळे कार्यक्षेत्रातील कार्यकर्ते अक्षरशः सैरभैर झाले आहेत.
Local Body Election : ‘दुसरी फळी’ सक्रिय; वरिष्ठ नेते संकोचात!
पक्षांचे ‘ए’ आणि ‘बी’ फॉर्म बहुधा १४–१५ नोव्हेंबरदरम्यानच वाटले जातील. त्यामुळे १७ नोव्हेंबरला मोठी गर्दी अपेक्षित आहे. या सर्वाचा ताण निवडणूक यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात येईल. खरी सत्त्वपरीक्षा १८ नोव्हेंबरला होणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच खरी राजकीय उलथापालथ घडू शकते. तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले नेते बंडखोरी करणार का? की दबावाखाली अर्ज मागे घेतील? कोणते पक्ष किती जखमी होतील? यावरच जिल्ह्याचे राजकीय समीकरण ठरणार आहे.
नेत्यांचे मुंबईतील राजकारण आणि स्थानिक पातळीवर उमेदवारांचे दडपण — या गोंधळामुळे बुलढाणा जिल्ह्यात अनिश्चितता, बंडखोरीचा धोका आणि गटबाजीचे सावट वाढले आहे.








