व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण दुष्काळ पाहणीसाठी गेलेले महसूलमंत्री बावनकुळे पोहोचले हिरव्यागार शेतात !

दुष्काळ पाहणीसाठी गेलेले महसूलमंत्री बावनकुळे पोहोचले हिरव्यागार शेतात !

‘सोयीचा भाग दाखवला’ आरोपाने दौऱ्यावर प्रश्नचिन्ह

Wardha : राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणी जाणून घेण्यासाठी मंत्री आणि प्रशासनाकडून पाहणी दौरे सुरू झाले आहेत. वर्धा जिल्ह्यातील आठपैकी सात तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आल्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. मात्र, या दौऱ्यात मंत्री ज्या शेतात पोहोचले, तेथील पीक तुलनेने हिरवेगार असल्याने दौऱ्याच्या नियोजनावरच प्रश्न उपस्थित झाले आहेत.

देवळी विधानसभा मतदारसंघातील रत्नापूर येथे मंत्री भेट देणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, नियोजित ठिकाणी जाण्यासाठी रस्ता योग्य नसल्याचे कारण देत मार्गात बदल करण्यात आला. त्यानंतर मंत्र्यांना दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले. या ठिकाणी शेतातील पीक हिरवेगार दिसत असल्याने दुष्काळाची प्रत्यक्ष तीव्रता मंत्र्यांसमोर आली का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

या प्रकरणावर कृषी अधीक्षक अरविंद उपरीकर यांनी वेगळी भूमिका मांडली. शेत हिरवेगार दिसत असले तरी त्यातून अपेक्षित उत्पादन मिळेलच असे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला भाग पुढील बाजूला नसून आतल्या परिसरात आहे. मात्र, तेथे वाहन जाणे शक्य नसल्याने पाहणीसाठी सोयीचा भाग निवडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मंत्र्यांसोबत असलेल्या एका ज्येष्ठ भाजप नेत्यानेच या प्रकारावर नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. दुष्काळाची खरी परिस्थिती मंत्र्यांपर्यंत पोहोचली नाही तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अपेक्षित मदत मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. दौरे केवळ औपचारिकतेपुरते मर्यादित राहू नयेत, अशी भूमिकाही त्यांनी मांडल्याचे सांगण्यात येते.

अजित दादांच्या अपघातामागचे ‘मफलरी’ कोण ? रोहित पवार करणार गौप्यस्फोट

देवळीचे आमदार राजेश बकाने यांनी मात्र या दौऱ्याबाबत थेट भाष्य करण्यास नकार दिला. कृषी विभागानेच दौऱ्याचे नियोजन केले होते, असे त्यांनी स्पष्ट केले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी केली आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी आमदार सुमित वानखेडे, माजी खासदार रामदास तडस, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

दुष्काळी मदत आणि नुकसानभरपाई मिळण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी तसेच ई-पिक पाहणी महत्त्वाची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिक पाहणी ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना बावनकुळे यांनी दिल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळताना कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी पंचनामे अचूक आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले. पंचनामे संयुक्तपणे आणि संबंधित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करावेत. ग्रामसभेसमोर पंचनामे मांडून ते संबंधित शेतकऱ्यांना दाखवावेत, जेणेकरून पुढे तक्रारी निर्माण होणार नाहीत, अशी सूचना महसूलमंत्र्यांनी केली.

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून बँकांनी कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये, अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारकडून लवकरच प्रत्यक्ष मदतीबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आमच्या पत्राची साधी दखलही घेतली नाही

दरम्यान, दुष्काळाची खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी मंत्री आणि लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जात असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. त्यामुळे पाहणी दौऱ्यांमध्ये प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागच मंत्र्यांसमोर येणे आणि त्यावर आधारित प्रशासनाकडून अचूक पंचनामे होणे महत्त्वाचे ठरणार आहे. वर्ध्यातील या दौऱ्यामुळे मात्र दुष्काळ पाहणीच्या नियोजनावर आणि प्रत्यक्ष नुकसान प्रशासनापर्यंत पोहोचते आहे की नाही, यावर चर्चा सुरू झाली आहे.

error: Content is protected !!