Indranil Naik appointed as new Guardian Minister : नवे पालकमंत्री म्हणून इंद्रनील नाईक यांची नियुक्ती
Gondia : राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचे पालकमंत्री पद सोडले असून, त्यांच्या जागी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची गोंदियाचे नवे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत वरळी येथे झालेल्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत या बदलाची घोषणा करण्यात आली. या निर्णयानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात खासदार प्रफुल पटेल यांनी विदर्भातील काही पालकमंत्र्यांवर टीका केली होती. “पालकमंत्री जिल्ह्यात येत नाहीत; ते केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीलाच दिसतात,” अशी थेट टीका करत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता गोंदियाच्या पालकमंत्रीपदात झालेला हा बदल त्या वक्तव्याशी जोडून पाहिला जात आहे.
Local Body Elections : आरक्षणाचा विषय संपला, आता जागा वाटपावर तापणार राजकारण!
मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब पाटील यांनी मंगळवारी गोंदियाचे पालकमंत्री पद तब्येतीच्या कारणास्तव सोडले आहे. त्यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन झाल्याने आणि सतत पायाच्या त्रासामुळे लांबचा प्रवास करणं अवघड असल्याचं कारण त्यांनी दिलं आहे. त्यामुळे गोंदियासारख्या दूरच्या जिल्ह्याची जबाबदारी पार पाडणे कठीण होत असल्याने त्यांनी पदत्यागाचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.
राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे आता गोंदियाच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विदर्भातील मंत्री असल्यामुळे त्यांना गोंदियातील कामकाज पाहणे तुलनेने सोयीस्कर राहील, असे अजित पवारांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
बाबासाहेब पाटील यांनी पालकमंत्री पदाची सुरुवातीपासूनच स्वतःच्या जिल्ह्यासाठी मागणी केली होती. मात्र, त्यांना आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद न मिळाल्याने नाराजी होती. हसन मुश्रीफ यांनाही अशीच परिस्थिती भेडसावत असल्याने दोघेही सुरुवातीपासून असमाधानी असल्याचे सूत्रांकडून समजते. याच पार्श्वभूमीवर बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात नवे समीकरणं चर्चेत आली आहेत.
Local Body Elections : सिंदखेड राजा नगरपरिषद मतदारयादीत गोंधळाचा भडका!
गोंदियात आता इंद्रनील नाईक हे नवे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहेत. त्यांच्याकडून जिल्ह्यातील कामकाजाला नवा वेग मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या फेरबदलाच्या निर्णयामागे केवळ आरोग्याचे कारण आहे की पक्षातील अंतर्गत नाराजी, यावर सध्या राजकीय रंग भरला जात आहे.








