Uncontrolled high blood pressure; possibility of angiography: उच्च रक्तदाब अनियंत्रित; अँजिओग्राफी होण्याची शक्यता
Mumbai : मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृतीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नाशिकच्या सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरल्यानंतर सत्र न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांचा रक्तदाब अचानक वाढला असून, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, उच्च रक्तदाबाचा त्रास नियंत्रणात नसल्याने पुढील काही दिवस त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी नाशिक पोलिसांना कळवले आहे.
नाशिक पोलिस अटकेच्या कारवाईसाठी लीलावती रुग्णालयात पोहोचले असतानाच माणिकराव कोकाटेंच्या प्रकृतीत अधिक चढ-उतार झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. डॉक्टरांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कोकाटेंना सध्या पूर्ण विश्रांतीची गरज असून, कोणतीही तणावपूर्ण कारवाई त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण करू शकते. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांची अँजिओग्राफी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अँजिओग्राफीचा अहवाल आल्यानंतरच पुढील उपचार आणि डिस्चार्जबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी ठरवलं… आणि ‘होणार नाही’ हे अशक्य !
दरम्यान, वैद्यकीय अहवाल आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मत लक्षात घेता, नॉन बेलेबल वॉरंटची प्रक्रिया रुग्णालयातच पार पाडली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत तात्काळ अटकेची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. अँजिओग्राफीचा अहवाल आल्यानंतर डॉक्टर आणि पोलिसांमध्ये चर्चा होऊन पुढील कारवाई ठरवली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत नाशिक पोलिसांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, लीलावती रुग्णालयातील रात्रपाळीचे इंचार्ज डॉक्टर कुलदीप देवरे यांचा जबाब नोंदवण्यात आला असून, रुग्णालय प्रशासनाकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या उपचारांचा सविस्तर वैद्यकीय अहवालही घेण्यात आला आहे. तसेच पुढे कोणते उपचार अपेक्षित आहेत, याची लेखी माहिती पोलिसांनी मागवली आहे. न्यायालयाच्या आदेशांचे पालन करताना वैद्यकीय अहवाल प्राप्त होईपर्यंत थांबणे क्रमप्राप्त असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नाशिकहून आलेल्या पोलिस पथकात महिला पोलिस नसल्याने वांद्रे पोलिसांची मदत घेण्यात आली असून, रुग्णालय प्रशासनानेही न्यायालयाच्या आदेशांचे पालन केले जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती आहे.
Buldhana Collector : जिल्ह्यात ८४ हजार ७५ एकल महिला; शहरी-ग्रामीण सर्वेक्षणातून वास्तव समोर
दरम्यान, माणिकराव कोकाटे नेमके कोणत्या प्रकरणामुळे अडचणीत आले आहेत, याचाही तपशील समोर आला आहे. नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरात सुमारे 30 वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटात येत असल्याचे दाखवून माणिकराव कोकाटे यांनी सदनिका मिळवली होती. स्वतः माणिकराव कोकाटे, त्यांचे भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चौघांनी मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका मिळवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी फेब्रुवारी 2025 मध्ये नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवले होते. त्यानंतर त्यांनी सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते, मात्र सत्र न्यायालयानेही शिक्षा कायम ठेवली.
BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणुकीआधी शरद पवार ठाकरे बंधूंच्या सोबत !
सत्र न्यायालयाच्या निकालानंतर माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. कायदा आणि नियम सर्वोच्च असून कोणत्याही व्यक्तीपेक्षा ते महत्त्वाचे आहेत, अशी भूमिका पक्षाकडूनही मांडण्यात आली आहे.
माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचे 13 जणांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. मात्र, सध्या लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांची भूमिका आणि वैद्यकीय अहवालावरच पुढील अटक कारवाई अवलंबून राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोकाटेंच्या अँजिओग्राफीच्या अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.








