“Is Jarange the owner of Maharashtra?”; Teli community in Amravati questions criticism of Bawankule : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; मनोज जरांगे पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी
Amravati मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ अमरावतीत तेली समाज आक्रमक झाला आहे. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत जरांगे पाटील यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. ‘जरांगे महाराष्ट्राचे मालक आहेत का?’ असा संतप्त सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
जरांगे पाटील यांच्याकडून बावनकुळे यांच्यावर वारंवार होत असलेल्या टीकेमुळे तेली समाजात नाराजी निर्माण झाल्याचा दावा महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. जरांगे यांच्याकडून करण्यात येणारे आरोप तथ्यहीन असल्याचेही त्यांनी म्हटले. या वक्तव्यांच्या निषेधार्थ महासभेचे पदाधिकारी आणि समाजबांधव एकत्र आले आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
Amravati Municipal corporation : महापालिकेतील दोन कोटींच्या दंडाची फाईल गायब?
निवेदनात म्हटले आहे की, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली लोकप्रतिनिधींचा सार्वजनिक अपमान करणे, शिवीगाळ करणे किंवा जातीय उल्लेख करणे योग्य नाही. अशा वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
‘जरांगे महाराष्ट्राचे मालक आहेत का?’
आंदोलनाबाबत बोलताना महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘जरांगे यांचा महाराष्ट्र झाला आहे का? ते महाराष्ट्राचे मालक आहेत का?’ असा सवाल त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
राष्ट्रीय तेली महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार रामदास तडस यांनीही जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. बावनकुळे हे ओबीसी समाजाचे नेते असल्याने त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचा आरोप तडस यांनी केला. ही टीका थांबली नाही, तर राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
बावनकुळे यांनी महसूलमंत्री म्हणून महसूल विभागात अनेक बदल केले असून ब्रिटिशकालीन जाचक कायदे रद्द करण्याचे काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेता त्यांना सातत्याने लक्ष्य करणे योग्य नसल्याचे तडस यांनी म्हटले.








