Technical glitch in Uday Samant’s aircraft; Gadchiroli visit postponed at the last minute : सुरजागड प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी होता दौरा, उड्डाणापूर्वीच तांत्रिक बिघाड
Nagpur राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांना आपला गडचिरोली दौरा ऐनवेळी स्थगित करावा लागला आहे. विमान उड्डाणापूर्वीच हा बिघाड लक्षात आल्यामुळे एक मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी मुंबईहून नागपूरमार्गे गडचिरोलीला जाणार होते. पूर्वनियोजनानुसार ते मुंबईहून विमानाने नागपूरला पोहोचणार होते आणि तिथून गडचिरोलीला रवाना होणार होते. मात्र, विमान उड्डाणापूर्वी करण्यात आलेल्या तांत्रिक तपासणीत बिघाड असल्याचे निदर्शनास आले.
सुरक्षेचा उपाय म्हणून हा दौरा त्वरित स्थगित करण्यात आला. विमानांच्या नियमित उड्डाणापूर्वी सर्व तांत्रिक चाचण्या केल्या जात असताना ऐनवेळी बिघाड कसा काय समोर आला, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
गडचिरोली जिल्ह्याला ‘स्टील सिटी’ म्हणून विकसित करण्याचा संकल्प शासनाने सोडला असून, यासाठी या जिल्ह्याचे पालकत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक येत असून अनेक प्रकल्प जाहीर झाले आहेत. सुरजागड परिसरातील खनिज संपत्ती सर्वोत्तम मानली जात असल्याने देश-विदेशातील कंपन्या येथे गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत.
तसेच, येथील दळणवळण सुलभ करण्यासाठी रस्त्यांच्या जाळ्यासोबतच एका नवीन विमानतळाची निर्मितीसुद्धा प्रस्तावित असून सध्या त्यासाठी योग्य जागेचा शोध घेतला जात आहे. विमानतळासाठी सुपीक जमीन देऊ नये, अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे.








