Mavia MPs meet Amit Shah, important decision to appoint SIT : मविआच्या खासदारांची अमित शाहांशी भेट, SIT नेमण्याचा महत्त्वाचा निर्णय
Delhi : शौर्य पाटील मृत्यू प्रकरणाने राज्यातील राजकारण तापले असतानाच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील दिल्लीत दाखल झाले आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटीत अमित शाह यांनी शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणी विशेष तपास पथक म्हणजेच SIT नेमण्याचे आश्वासन दिल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली दौऱ्यावर शौर्य पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारवर थेट सवाल उपस्थित करत दोषी शिक्षकांवर तात्काळ कारवाई, संबंधित शाळेची मान्यता रद्द करणे आणि प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. सरकारने नेमलेल्या समितीच्या अहवालात शौर्यच्या मृत्यूस शाळा आणि शिक्षक जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले असून तरीही दोषींवर कारवाई होत नसेल तर हा मरणोत्तर अन्याय ठरेल, असे जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितले.
Shashikant Shinde : महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका महाविकास आघाडी संयुक्तपणे लढणार
याच दरम्यान, महाराष्ट्रातील मविआच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत शौर्य पाटील मृत्यू प्रकरणात केंद्रीय पातळीवर हस्तक्षेपाची मागणी केली. खासदार निलेश लंके यांनी अमित शाह यांना यासंदर्भात पत्र दिले. या भेटीत अमित शाह यांनी तात्काळ SIT नेमण्याचे आश्वासन देत उद्याच विशेष तपास पथक स्थापन करण्याबाबत सूचना देणार असल्याचे सांगितले. या निर्णयामुळे पाटील कुटुंबाला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी सरकार आणि केंद्र नेतृत्वावर अधिक तीव्र शब्दांत टीका केली. आठ दिवसांत आरोपींना अटक झाली नाही तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला. मिशनरी शाळेचे फादर आणि व्यवस्थापनाने याची दखल घ्यावी, महाराष्ट्रासह इतर राज्यांतील शाळांच्या शाखा लक्षात ठेवाव्यात, असे म्हणत जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला. मुंबई बंद करण्याची ताकद आमच्यात आहे, आमच्या मुलाचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Local Body Elections : अकोला महापालिकेत तीन वर्षांनंतर प्रशासकराज संपणार
अमित शाह यांची भेट घेणार का, असा प्रश्न विचारला असता, ते काय चौथी पास आहेत का त्यांना भेटून सांगायला, त्यांना कळत नाही का, असा प्रतिप्रश्न जरांगे पाटील यांनी केला. मध्य प्रदेशसह इतर राज्यांमध्ये मराठा समाज भाजपला महत्त्वाचा वाटतो, मग महाराष्ट्रातील मराठ्यांच्या मुलाला न्याय का मिळत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आरोपींना आठ दिवसांत अटक करण्याची मागणी करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकरणात लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
Local Body Elections : नऊ जागांसाठी रणधुमाळी नाहीच! तीन पालिकांची निवडणूक; प्रचाराचा सूर मंद
शौर्य पाटील हा राष्ट्रगीत झालेच पाहिजे असे म्हणणारा राष्ट्राभिमानी विद्यार्थी होता. शाळेच्या भिंतींवर दया आणि शांतीचे संदेश लिहिलेले असताना आमच्या मुलासोबत असे वर्तन का करण्यात आले, असा सवाल उपस्थित करत जरांगे पाटील यांनी संबंधित शाळेच्या संस्थापकांनाही थेट इशारा दिला आहे.
एकीकडे दिल्लीत आंदोलनाची धार वाढत असताना आणि दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्र्यांकडून SIT नेमण्याचे आश्वासन मिळाल्याने शौर्य पाटील मृत्यू प्रकरणावर आता देशपातळीवर लक्ष केंद्रीत झाले आहे. या प्रकरणात प्रत्यक्ष कारवाई कधी होते आणि दोषींना कधी अटक होते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
____








