
ritu-tawade-mumbai-mayor-sanjay-ghadi-deputy-mayor-bjp-shivsena : भाजप-शिवसेना युतीकडून अधिकृत घोषणा
Mumbai : मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका रितू तावडे यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी अधिकृतपणे त्यांच्या नावाची घोषणा केली. याचवेळी उपमहापौरपदी शिंदेसेनेच्या शिंदे गटाकडून संजय शंकर घाडी यांची निवड करण्यात आली असून ते पुढील सव्वा वर्षांसाठी ही जबाबदारी सांभाळणार आहेत.
महापौरपदासाठी भाजपकडून रितू तावडे आणि शीतल गंभीर यांच्या नावांची जोरदार चर्चा होती. मात्र अखेर पक्ष नेतृत्वाने रितू तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांना महापौरपदाची संधी दिली. या घोषणेनंतर मुंबईच्या राजकीय वर्तुळात भाजप-शिवसेना युतीच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.
india Us Trade Deal : ३० ट्रिलियन डॉलरचा अमेरिकी बाजार भारतासाठी खुला!
रितू तावडे या भाजपच्या अनुभवी आणि प्रभावी नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी 2012 साली प्रभाग क्रमांक 127 मधून प्रथमच नगरसेवक म्हणून विजय मिळवला होता. त्यानंतर 2017 मध्ये घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक 121 मधून त्या पुन्हा निवडून आल्या. 2025 च्या निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक 132 मधून विजय मिळवत आपली राजकीय ताकद सिद्ध केली.
महापालिकेतील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी असून त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही यशस्वीपणे पार पाडली आहे. याच पार्श्वभूमीवर त्या महापौरपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या.
भाजप-शिवसेना युतीच्या या निर्णयामुळे मुंबई महापालिकेच्या प्रशासनात स्थैर्य येईल, तसेच शहराच्या विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास पक्षनेतृत्वाकडून व्यक्त करण्यात येत आहे.








