सिरोंचा तालुक्यात हजारो हेक्टर शेतीचे नुकसान; शेतकऱ्यांनी घेतली आमदारांची भेट
Sironcha : तेलंगणा सरकारच्या गोदावरी नदीवरील मेडिगड्डा (लक्ष्मी) बॅरेजच्या बॅकवॉटरचा फटका सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना सलग चार वर्षांपासून बसत आहे. दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतानाही या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तेलंगणा सरकारच्या पातळीवरच हा प्रश्न उपस्थित करण्यासाठी राजकीय पाठपुरावा सुरू केला आहे.
सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सतीश गंजीवार यांच्या नेतृत्वात प्रभावित शेतकऱ्यांनी तेलंगणाचे माजी मंत्री तथा बालकोंडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रशांत रेड्डी यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. मेडिगड्डा बॅरेजच्या पाहणी दौऱ्यासाठी आमदार प्रशांत रेड्डी आले असता शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी बॅरेजमधील पाण्याच्या फुगवट्यामुळे सिरोंचा तालुक्यात निर्माण होणाऱ्या पूरस्थितीची सविस्तर माहिती देण्यात आली.
ऐन दिवाळीत हक्काची मजुरी मिळाली, आमच्या घरात आनंदाचे दिवे उजळले… धन्यवाद सुधीरभाऊ!
हा प्रश्न केवळ स्थानिक पातळीवर मांडून उपयोग होणार नसल्याने तो तेलंगणा विधानसभेत उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधावे, अशी प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी केली. बॅकवॉटरमुळे बाधित होणाऱ्या गावांना दिलासा देण्यासाठी दोन्ही राज्यांच्या समन्वयातून ठोस निर्णय घेण्याची गरजही यावेळी अधोरेखित करण्यात आली.
मेडिगड्डा बॅरेजमुळे पावसाळ्यात गोदावरीच्या पाण्याचा निचरा प्रभावित होऊन बॅकवॉटरचा फुगवटा निर्माण होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. याचा परिणाम भामरागड, भेजी, मरेगड्डा आणि रेगुंठा परिसरातील गावांवर होतो. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली जात असल्याने पिकांचे नुकसान, उत्पन्नात घट आणि आर्थिक संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. सलग चार वर्षांपासून ही परिस्थिती कायम असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
दरम्यान, या समस्येची दखल महाराष्ट्र शासनानेही घेतली आहे. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी मेडिगड्डा बॅरेजची प्रत्यक्ष पाहणी केली होती. यावेळी सिरोंचा परिसरातील गावांना पुराच्या धोक्यापासून सुरक्षित ठेवणे, बॅकवॉटरची तीव्रता कमी करणे आणि आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी थेट तेलंगणाच्या आमदारांकडे धाव घेतल्याने या प्रश्नाला आंतरराज्यीय राजकीय पाठपुराव्याची जोड मिळाली आहे. आमदार प्रशांत रेड्डी हा विषय विधानसभेत मांडतात का आणि त्यातून तेलंगणा सरकारकडून काही ठोस निर्णय होतो का, याकडे सिरोंचा तालुक्यातील पूरप्रभावित शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.








