वाशिममध्ये रेशनकार्डधारकांची निराशा; पण कार्यालयातील वाटपामुळे राजकीय चर्चा
Washim : सर्वसामान्यांच्या दिवाळीत गोडवा निर्माण करण्यासाठी दरवर्षी जाहीर होणारा शासनाचा ‘आनंदाचा शिधा’ यंदा रेशनकार्डधारकांपर्यंत पोहोचलाच नसल्याचे चित्र वाशिम जिल्ह्यात पाहायला मिळाले. दिवाळीचा सण उलटून जात असतानाही स्वस्त धान्य दुकानांमध्ये शिध्याची पाकिटे दाखल न झाल्याने हजारो कुटुंबांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले. विशेष म्हणजे, शासनाच्या योजनेचा लाभ मिळत नसताना खासदार संजय देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयातून मात्र जीवनावश्यक वस्तूंच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले. त्यामुळे शासकीय योजनेच्या अंमलबजावणीवरून राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांनाही सणाचा आनंद घेता यावा, या हेतूने शासनाकडून रेशनकार्डधारकांना सवलतीच्या दरात ‘आनंदाचा शिधा’ उपलब्ध करून दिला जातो. या पाकिटामध्ये रवा, मैदा, साखर आणि खाद्यतेल यांसारख्या वस्तूंचा समावेश असतो. यंदाही लाभार्थ्यांना अशाच मदतीची अपेक्षा होती. मात्र, लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येपर्यंत रेशन दुकानांमध्ये शिधा पोहोचला नसल्याने लाभार्थ्यांना बाजारातूनच या वस्तूंची खरेदी करावी लागली.
दरम्यान, खासदार संजय देशमुख यांच्या वाशिम येथील जनसंपर्क कार्यालयात वितरित करण्यात आलेल्या वस्तूंच्या पाकिटांचे स्वरूप शासनाच्या ‘आनंदाचा शिधा’ पाकिटांशी मिळतेजुळते असल्याचे दिसून आले. प्रत्येक वस्तू एक किलोच्या प्रमाणात असल्याने या वाटपाची विशेष चर्चा होत आहे. पाकिटे घेण्यासाठी कार्यालयाबाहेर महिलांसह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिवाळीच्या पूर्वीच दुष्काळग्रस्त जनतेसाठी शिवसेनेच्या वतीने हा आनंदाचा शिधा मुंबईवरून रवाना केला होता. त्याचे वाटप खासदार कार्यालयातून झाले.
यापूर्वी सर्वसामान्यांसाठी शासनाने असाच शिधा स्वस्त धान्य दुकानामार्फत उपलब्ध केला होता. यंदा शासनाकडून ‘आनंदाचा शिधा’ पाठविण्यात आलेला नाही. याबाबत कोणतेही अधिकृत निर्देशही प्राप्त झालेले नाहीत. अन्य ठिकाणी धान्य अथवा वस्तूंच्या पाकिटांचे वितरण झाले असल्यास त्याचा शासकीय योजनेशी संबंध जोडता येणार नाही. असे पुरवठा यासंदर्भात पुरवठा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
एकीकडे शासनाच्या योजनेचा लाभ सामान्य रेशनकार्डधारकांना मिळाला नाही, तर दुसरीकडे त्याच धर्तीवरील पाकिटांचे खासदारांच्या कार्यालयातून वितरण झाल्याने अनेक चर्चा होत आहे. यंदा आनंदाच्या शिध्यापासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना दिलासा कधी मिळणार, हा प्रश्न मात्र उपस्थित केला जात आहे.








