सात महिन्यांपासून रखडलेली मजुरी अखेर हातात; लेकरांच्या चेहऱ्यावर हसू, कष्टकरी कुटुंबांच्या दिवाळीत आनंदाची पखरण
Chandrapur : दिवाळी म्हणजे आनंदाचा, समाधानाचा आणि कुटुंबासोबत सुखाचे क्षण वेचण्याचा सण. मात्र, बल्लारपूर येथील लॉटिंग गँगच्या मजुरांसाठी यंदाची दिवाळी चिंतेच्या सावटाखाली जाण्याची वेळ आली होती. एप्रिल ते ऑक्टोंबर अशा सलग सात महिन्यांची मजुरी थकीत असल्याने घरखर्चाचा ताळमेळ बिघडला होता. लेकरांच्या छोट्या-मोठ्या इच्छा, सणासाठीची खरेदी आणि घरातील रोजच्या गरजा भागवताना या कष्टकरी कुटुंबांची मोठी ओढाताण होत होती. दसऱ्याचा सणही मजुरीविना गेला होता. त्यामुळे दिवाळी तरी आनंदात साजरी करता येईल का, हा प्रश्न मजुरांच्या मनात होता.
मात्र, ऐन दिवाळीत त्यांच्या हातात हक्काच्या कष्टाचा मोबदला आला आणि अनेक दिवसांपासून मनात साचलेली चिंता दूर झाली. घरात दिवाळीचा आनंद फुलला, लेकरांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि सण साजरा करण्यासाठी बळ मिळाले. या आनंदामागे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला पुढाकार आणि केलेला ठाम पाठपुरावा होता. त्यामुळे मजुरांच्या मनातून उत्स्फूर्तपणे उमटणारे शब्द होते धन्यवाद सुधीरभाऊ.
बल्लारपूर येथील वाहतूक विपणन विभागांतर्गत डेपोमध्ये कार्यरत असलेल्या लॉटिंग गँगच्या मजुरांची सात महिन्यांची मजुरी प्रलंबित होती. वारंवार प्रतीक्षा करूनही पैसे मिळत नसल्याने मजुरांमध्ये अस्वस्थता वाढली होती. अखेर आंदोलनाचा पवित्रा घेण्याच्या तयारीत असलेल्या मजुरांनी भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश महासचिव अजय दुबे यांच्याकडे आपली व्यथा मांडली. दुबे यांनी हा प्रश्न आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिला.
मजुरांच्या कष्टाचा मोबदला मिळण्यासाठी त्यांना आंदोलनाची वेळ येऊ नये, ही भूमिका घेत मुनगंटीवार यांनी तातडीने प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू केल्या. वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र लिहून थकीत मजुरी अदा करण्याची मागणी केली. वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. खंदारे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून या प्रश्नाची गंभीरता त्यांच्या निदर्शनास आणून दिली. केवळ पाच महिन्यांची थकीत मजुरीच नव्हे, तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांची मजुरीही उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.
त्यांच्या या हस्तक्षेपानंतर एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांची थकीत मजुरी मजुरांना प्राप्त झाली. त्यासोबतच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांची मजुरीही उपलब्ध झाली. त्यामुळे अनेक दिवसांपासून रखडलेल्या या प्रश्नातून मजुरांची सुटका झाली.
खरं तर, मजुरीची रक्कम ही या कुटुंबांसाठी केवळ पैशांची बाब नव्हती. त्यामागे त्यांच्या घामाचा मोल होता, मुलांच्या अपेक्षा होत्या, संसाराच्या गरजा होत्या आणि सणाच्या दिवशी आपल्या कुटुंबाला आनंद देता यावा, ही छोटीशी इच्छा होती. दिवाळीच्या दिव्यांसोबत घरात गोडधोड व्हावे, मुलांना आवडीची वस्तू घेता यावी, कुटुंबासोबत दोन आनंदाचे क्षण घालवता यावेत, एवढीच त्यांची अपेक्षा होती. हक्काची मजुरी मिळाल्याने या साऱ्या छोट्या-छोट्या इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला.
सरकारी ‘आनंदाचा शिधा’ गायब; खासदारांकडे मात्र दिवाळी फराळाचे वाटप!
प्रशासनाच्या दिरंगाईमुळे कष्टकऱ्यांच्या घरात निर्माण झालेला चिंतेचा अंधार दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधीने संवेदनशीलतेने पुढाकार घेतला, तर त्यातून सामान्य माणसाच्या आयुष्यात किती मोठा आनंद निर्माण होऊ शकतो, याचे हे बोलके उदाहरण ठरले. दिवाळीच्या आनंदात सहभागी होताना मजुरांच्या मनात मुनगंटीवार यांच्या विषयी निर्माण झालेली कृतज्ञता त्यांच्या शब्दांतून व्यक्त होत आहे. कारण त्यांच्यासाठी ही केवळ थकीत मजुरी मिळण्याची बाब नव्हती, तर ऐन सणाच्या दिवशी आपल्या कष्टाचा सन्मान झाल्याची भावना होती.हक्काची मजुरी मिळाली, आमच्या घरात आनंदाचे दिवे उजळले… आमची दिवाळी आनंदात साजरी झाली. सुधीरभाऊ, तुमचे मनापासून आभार. अशी भावना मजुरांनी व्यक्त केली.








