Muncipal election : सोलापुरात भाजपातही नाराजी नाट्य उफाळले

Loyalty pattern poses new challenge to Mahayuti : ‘निष्ठावंत पॅटर्न’मुळे महायुतीसमोर नवे आव्हान

Mumbai : राज्यभर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना सोलापुरात भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सोलापुरातील भाजपातील अंतर्गत अस्वस्थता उघड झाली असून महायुतीच्या गणितात नवा पेच निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुभाष देशमुख यांनी नाव न घेता पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका करत भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट न मिळाल्यास ते ज्या पक्षात जातील, त्या पक्षाचा प्रचार करू, अशी स्पष्ट भूमिका मांडली होती. या विधानामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली असून ‘निष्ठावंत पॅटर्न’ पुन्हा चर्चेत आला आहे. भाजपमध्ये काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची भावना सोलापुरात बळावत असल्याचे या भूमिकेतून स्पष्ट होत आहे.

Local Body Elections : स्वीकृत नगरसेवकांसाठी सत्तासंघर्ष; पालिकेत कुणाची लागणार ‘लॉटरी’?

सुभाष देशमुख यांच्या या भूमिकेवर आता पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नेत्याला कार्यकर्त्यांबद्दल प्रेम असणे साहजिक असल्याचे सांगत निवडणुकीत पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली आहे, त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले. देशमुख यांनी व्यक्त केलेल्या भावना या कार्यकर्त्यांवरील प्रेमापोटी असू शकतात, असेही त्यांनी नमूद केले. मात्र, कोणत्याही नेत्यावर दुसऱ्या पक्षात गेलेल्या लोकांचा प्रचार करण्याची वेळ येणार नाही, असा ठाम दावा जयकुमार गोरे यांनी केला.

याचबरोबर, सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांच्या नाराजीबाबत बोलताना जयकुमार गोरे यांनी संयमित भूमिका घेतली. दोन्ही नेते ज्येष्ठ असून आपण एक छोटा कार्यकर्ता असल्याचे सांगत, त्यांनी व्यक्त केलेल्या सूचनांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन, असे गोरे यांनी म्हटले. सर्व नेत्यांना विश्वासात घेऊनच तिकीट वाटप होईल, असेही त्यांनी आश्वस्त केले.

Municipal election : महायुती व महाविकास आघाडीत जागावाटपाचे भिजत घोंगडे कायम

दरम्यान, सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरूनही तणाव दिसून येत आहे. शिवसेनेकडून सोलापुरात ५० जागांची मागणी करण्यात आली असून त्यात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. युतीबाबत चर्चा सुरू असून सोलापुरात पुन्हा चर्चा होईल, सर्व गोष्टी जुळून आल्यास महायुती निश्चित होईल, असा विश्वास जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. सोलापूर शहर भाजपचा बालेकिल्ला असल्याचे सांगत, येथे तीनही आमदार भाजपचे आहेत आणि यापूर्वी सत्ता देखील भाजपचीच होती, त्यामुळे सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

BMC election : तुर्तास चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच, जागावाटपाचा तिढ्याकडे लक्ष

मात्र, दुसरीकडे भाजप आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी पुढे रेटलेला ‘निष्ठावंत पॅटर्न’ भाजप नेतृत्वासाठी डोकेदुखी ठरत आहे. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यास ते महायुतीतील इतर पक्षात जाणार आणि त्यांचा प्रचार केला जाईल, अशी भूमिका घेतल्याने पक्षातील शिस्त, युतीतील समन्वय आणि निवडणुकीतील एकसंघपणा यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

एकूणच पाहता, सोलापुरात भाजपही नाराजीच्या नाट्यापासून मुक्त नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राज्यभर सुरू असलेल्या जागावाटपाच्या संघर्षात सोलापुरातील भाजपमधील अंतर्गत अस्वस्थता आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मुद्दा महायुतीसाठी आव्हान ठरणार का, हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतर्गत नाराजी, युतीतील तणाव आणि कार्यकर्त्यांचे मनोबल सांभाळणे हेच सर्व पक्षांसमोरचे मोठे आव्हान बनले आहे.

___