Municipal election : आठवलेंची ‘मैत्रीपूर्ण’ बंडखोरी भाजपने देऊ केलेल्या सात जागा नाकारल्या

RPI fielded 39 candidates in Mumbai on its own : रिपाइंने मुंबईत ३९ उमेदवार स्वबळावर रिंगणात उतरवले

Mumbai : महायुतीतील घटक पक्ष असलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं)ने मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपविरोधात ‘मैत्रीपूर्ण बंडखोरी’चा मार्ग स्वीकारत स्वबळावर ३९ जागा लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. भाजपकडून सन्मानजनक जागा न मिळाल्याने नाराज झालेल्या रिपाइंने सोमवारी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रामदास आठवले यांनी भाजपकडे १५ जागांची मागणी केली होती. या जागा भाजपच्या ‘कमळ’ या निवडणूक चिन्हावर लढण्याची तयारीही त्यांनी दर्शवली होती. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपने केवळ सात जागा देऊ केल्याने रिपाइंने त्या नाकारल्या आणि थेट ३९ उमेदवार मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला. २ जानेवारी हा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून, तोपर्यंत आठवले आपल्या स्वबळाच्या भूमिकेवर ठाम राहतात की तडजोड करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Akola Municipal Corporation Election : पक्षनिष्ठा गुंडाळून कोलांटउड्या, पक्षांतरांचा सपाटा

महायुतीमध्ये शिवसेनेसोबत जोगेंद्र कवाडे यांची पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि भाजपसोबत रामदास आठवले यांची रिपाइं असे दोन आंबेडकरी पक्ष आहेत. मात्र या निवडणुकीत आठवले यांनी भाजपपासून थोडेसे दूर जात स्वतंत्र भूमिका घेतल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईसह ठाणे, पिंपरी-चिंचवड, पुणे, नाशिक, मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकांमध्येही भाजपने रिपाइंला अपेक्षित जागा दिल्या नसल्याचा आरोप आठवले यांनी केला आहे. शेवटपर्यंत भाजपने आपल्याला झुलवत ठेवले, असा थेट आरोप त्यांनी केला आहे.

मुंबई महापालिकेत १९९२ नंतर रिपाइंचा एकही नगरसेवक विजयी झालेला नाही. मात्र २०१७ च्या निवडणुकीत भाजपने रिपाइंला मुंबईत १७ जागा दिल्या होत्या. यंदा मात्र चित्र बदलले असून रिपाइंने स्वबळाचा निर्णय घेतला आहे. मुंबईत अनुसूचित जातींचे १६ लाखांहून अधिक मतदार असून १५ प्रभाग या प्रवर्गासाठी राखीव आहेत. रिपाइंने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत प्रामुख्याने आठवले यांचे कार्यकर्ते, पक्ष पदाधिकारी तसेच त्यांच्या पत्नींचा समावेश आहे.

दरम्यान, काँग्रेसने मुंबईत ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला तब्बल ६२ जागा दिल्याने आंबेडकरी राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे. यामुळे रामदास आठवले यांच्यावरही दबाव वाढला असून, भाजपने देऊ केलेल्या सात जागा स्वीकारण्याची इच्छा असूनही कार्यकर्त्यांच्या दबावामुळे ते शक्य झाले नसल्याचे बोलले जात आहे.

Amravati Municipal Corporation election : महायुती दुभंगली; नाराजीचा सूर, राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार

राज्यसभेचे सदस्यत्व आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रीपद भाजपकडून मिळाल्याने रामदास आठवले हे भाजपच्या गृहीतकातील नेते मानले जातात. मात्र राज्यात रिपाइंची संघटनात्मक ताकद मर्यादित असली तरी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी आठवले कमळ चिन्हावर निवडणूक लढण्यास तयार होते. तरीही भाजपकडून सन्मानजनक जागा न मिळाल्याने रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी ३९ प्रभागांमध्ये बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे चित्र आहे. आता या ‘मैत्रीपूर्ण बंडखोरी’चा महायुतीवर आणि विशेषतः भाजपवर नेमका काय परिणाम होतो, हे निकालातून स्पष्ट होणार आहे.