व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Nagpur municipal corporation : नागपूर भाजपमध्ये अखेर ‘डॅमेज कंट्रोल’; नाराजांचे राजकीय पुनर्वसन!

Nagpur municipal corporation : नागपूर भाजपमध्ये अखेर ‘डॅमेज कंट्रोल’; नाराजांचे राजकीय पुनर्वसन!

Bjp apply damage control formula for co-opt member in Nagpur municipal corporation: बंडखोरी आणि अंतर्गत गटबाजी शमवण्यासाठी केली उपाययोजना

Nagpur नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उफाळून आलेली बंडखोरी आणि अंतर्गत गटबाजी शमवण्यासाठी अखेर भाजपने ‘स्वीकृत सदस्य’ पदाचा अस्त्र म्हणून वापर केला आहे. तिकीट कापल्यामुळे संतापलेल्या आणि थेट बंडाचे निशाण फडकावणायांना महापालिकेत पाठवून भाजपने आगामी राजकीय संघर्षापूर्वी आपली मोर्चेबांधणी भक्कम केली आहे. भाजपच्या या खेळीमुळे अनेक वर्षांपासून ‘वेटिंग लिस्ट’वर असलेल्या नेत्यांचा वनवास आता संपला असून, २० एप्रिलच्या महापालिका सभेत त्यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी नाट्य रंगले होते. अनेक दिग्गज नेत्यांची समजूत काढताना पक्षश्रेष्ठींना मोठी कसरत करावी लागली होती. यात प्रामुख्याने दक्षिण नागपूरचे संजय ठाकरे यांनी वारंवार डावलले जात असल्याने बंडाचे निशाण फडकावले होते. माजी शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्या काळात त्यांचे तिकीट कापले गेले होते, त्यामुळे यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी आमदार मोहन मते यांनी मध्यस्थी करत त्यांची समजूत काढली आणि ठाकरे माघारी परतले. पक्षाने आता त्यांना स्वीकृत सदस्य देऊन त्यांच्यावर झालेला अन्याय दूर केल्याचे मानले जात आहे.

Yashwant Manohar : आंबेडकर चरित्र-साधने समिती’वरून वादाचे वादळ; समिती बरखास्त करण्याची मागणी

दुसरीकडे, पूर्व नागपुरात काँग्रेसचे माजी दिग्गज नेते सतीश चतुर्वेदी यांचे खंदे समर्थक असलेले देवेंद्र मेहर यांनाही न्याय मिळाला आहे. आमदार कृष्णा खोपडे यांनी मेहर यांना भाजपमध्ये आणले होते, मात्र प्रभाग रचना आणि आरक्षणाच्या पेचामुळे त्यांना तिकीट देता आले नव्हते. भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून ते काहीसे अडगळीत पडले होते, मात्र आता त्यांना मुख्य प्रवाहात आणले गेले आहे. त्यांच्यासोबतच जितेंद्र ठाकूर यांच्या नावावरही शिक्कामोर्तब झाले आहे.

Chandrashekhar Bawankule : बावनकुळे ‘ॲक्शन मोड’वर! ड्रग्ज रॅकेटचा ‘मोठा गेम’ होणार

सर्वात लक्षवेधी संघर्ष सुबोध आचार्य आणि श्रीकांत आगलावे यांच्यात पाहायला मिळाला होता. या दोघांमधील जुन्या भांडणामुळे गेल्या वेळी दोघांचेही तिकीट कापण्यात आले होते. यावेळी मात्र भाजपने दोघांचेही समाधान केले आहे. श्रीकांत आगलावे निवडणुकीत निवडून आले, तर सुबोध आचार्य यांना आता स्वीकृत सदस्य म्हणून पालिकेत पाठवले जात आहे. तसेच, दक्षिण-पश्चिम नागपूरमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि प्रचाराची धुरा सांभाळणारे रितेश गावंडे यांनाही या यादीत स्थान देऊन त्यांच्या निष्ठेचे फळ देण्यात आले आहे.

एकूणच, महापालिकेच्या या नियुक्त्यांद्वारे भाजपने शहरातील आपल्या प्रमुख विधानसभा मतदारसंघांमधील अंतर्गत कलह मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. बंडखोरी मोडीत काढण्यासाठी आणि निष्ठावंतांना खुश ठेवण्यासाठी भाजपने उचललेले हे पाऊल आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

error: Content is protected !!