व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Narhari Zirwal : ‘कशाला उपोषण करता, खाऊन-पिऊन आंदोलन करा’ मंत्री झिरवाळ यांचा...

Narhari Zirwal : ‘कशाला उपोषण करता, खाऊन-पिऊन आंदोलन करा’ मंत्री झिरवाळ यांचा सल्ला

narhari-zirwal-khaun-piun-andolan-tribal-students-controversial-statement-pune : आंदोलनाची टवाळी करण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप, वाद पेटला !

 

Pune : विविध मागण्यांसाठी पुण्यात आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची भेट घेताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्यात नवा राजकीय वाद पेटला आहे. “कशाला उपोषण करता, खाऊन-पिऊन आंदोलन करा,” असा सल्ला झिरवाळ यांनी विद्यार्थ्यांना दिल्याचे समोर आल्यानंतर आंदोलक विद्यार्थ्यांसह विरोधकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याऐवजी त्यांच्या आंदोलनाची टवाळी करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झिरवाळ यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली. मात्र, यावेळी त्यांनी केलेल्या कथित वक्तव्यामुळे प्रश्न सोडवण्याऐवजी वाद अधिक चिघळल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने संवेदनशील भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा असताना मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे सरकारचीच कोंडी झाल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

झिरवाळ यांच्या वक्तव्यावर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. झिरवाळ यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना, “झिरवाळ स्वतः खाऊन-पिऊनच सर्व कामे करतात, त्यामुळेच त्यांनी विद्यार्थ्यांनाही तसाच सल्ला दिला असावा,” असा तिखट टोला त्यांनी लगावला. विद्यार्थी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करत असताना त्यांच्या प्रश्नांची चेष्टा करणे योग्य नसल्याचे सांगत वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याऐवजी त्यांना अशा प्रकारचे सल्ले देणे हे सरकारच्या असंवेदनशीलतेचे उदाहरण असल्याची टीकाही त्यांनी केली.

Escape Corporators : भाजपमध्ये जाण्यासाठी निघाले अन् रातोरात शिंदेंच्या शिवसेनेत दाखल

उद्धवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनीही झिरवाळ यांच्या वक्तव्यावरून सरकारला धारेवर धरले. झिरवाळ यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांचा अपमान केल्याचा आरोप दानवे यांनी केला. आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असताना मंत्र्यांकडून अशा प्रकारची वक्तव्ये केली जात असतील, तर सरकारची विद्यार्थ्यांप्रती असलेली भूमिका काय आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही लक्ष्य केले. आपल्या पक्षातील आमदार आणि मंत्र्यांना त्यांनी सांभाळावे, असा खोचक सल्ला दानवे यांनी दिला.

दरम्यान, पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. शिक्षण, वसतिगृह प्रवेश आणि इतर विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. सरकारने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. या आंदोलनाची दखल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही घेतली होती. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आदिवासी विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली होती.

Bjp Message : ‘मित्रपक्षांना सोबत ठेवा, निधीत भेदभाव नको’; २०२९ची तयारी आतापासूनच करण्याचे निर्देश

राहुल गांधी यांच्या पत्रानंतर आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सरकारकडून हालचाली सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशासाठी लागू असलेली ३० वर्षांची वयोमर्यादा शिथिल करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आंदोलनातील काही मागण्यांवर सरकारकडून सकारात्मक पाऊल उचलण्यात आल्याचे दिसत असले, तरी विद्यार्थ्यांच्या इतर मागण्यांचे काय, असा प्रश्न अद्याप कायम आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृह प्रवेशासाठी असलेली ३० वर्षांची वयोमर्यादा शिथिल करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, त्याचवेळी नरहरी झिरवाळ यांच्या “खाऊन-पिऊन आंदोलन करा” या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने ठोस निर्णय घेऊन आंदोलन संपवण्यासाठी पुढाकार घेण्याऐवजी मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यामुळे आता झिरवाळ यांच्या वक्तव्यावर सरकारकडून काय स्पष्टीकरण दिले जाते आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या उर्वरित मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
___

error: Content is protected !!