व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Vijay Wadettiwar : सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा वडेट्टीवारांचा सनसनाटी दावा

Vijay Wadettiwar : सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा वडेट्टीवारांचा सनसनाटी दावा

vijay-wadettiwar-supriya-sule-obc-certificate-claim-maharashtra-politics-mva : सुळेंचे थेट पुरावे सादर करण्याचे आव्हान

Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी समाजाचे जात प्रमाणपत्र असल्याचा सनसनाटी दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नागपुरात माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी हा दावा केल्याने महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याची आपल्याला पक्की माहिती असल्याचे सांगत, “पक्की माहिती असल्याशिवाय मी कोणत्याही विषयावर भाष्य करत नाही,” असा दावा वडेट्टीवार यांनी केला. यासोबतच अर्ध्या मराठा नेत्यांनी ओबीसी प्रमाणपत्रे काढून ठेवली असल्याचा आरोपही त्यांनी केल्याने या वक्तव्याला राजकीय वर्तुळात मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.वडेट्टीवार यांच्या आरोपानंतर सुप्रिया सुळे यांनी तातडीने प्रतिक्रिया देत हा दावा फेटाळून लावला. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ वडेट्टीवार यांनी पुरावे सादर करावेत, असे थेट आव्हानच त्यांनी दिले.

“माझ्याकडे जन्म दाखला, पदवीचे प्रमाणपत्र, लग्नाचा दाखला आणि खासदारकीचे प्रमाणपत्र याशिवाय कोणतेही ओबीसी प्रमाणपत्र नाही,” असे सुळे यांनी स्पष्ट केले वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपाचा पुरावा सादर करावा अथवा सार्वजनिकरित्या माफी मागावी, अशी मागणी सुळे यांनी केली आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांच्या दाव्याला सुळे यांनी थेट प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही नेत्यांमधील वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र काँग्रेसमधील काही नेते आपल्याला सातत्याने लक्ष्य का करत आहेत, असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची तक्रार काँग्रेसच्या वरिष्ठ केंद्रीय नेतृत्वाकडे करण्याचे संकेत त्यांनी दिले. याबाबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडेही आपण भूमिका मांडणार असल्याचे सुळे यांनी सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील राजकीय संबंधांवर या वादाचा परिणाम होतो का, याकडे लक्ष लागले आहे.

Narhari Zirwal : ‘कशाला उपोषण करता, खाऊन-पिऊन आंदोलन करा’ मंत्री झिरवाळ यांचा सल्ला

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विजय वडेट्टीवार यांनी अलीकडच्या काळात आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली ‘मंडल यात्रा’ काढण्यात आली होती. त्यापूर्वी नागपुरात ओबीसी समाजाचा मोठा मोर्चाही आयोजित करण्यात आला होता. ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत असतानाच आता मराठा समाजाशी संबंधित नेत्यांवर वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनीही सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही त्यांनी तीव्र टीका केली असून, मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास थेट मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Vijay Wadettiwar : एमपीएससी पेपरफुटीत थेट सत्ताधाऱ्यांचा हात

दरम्यान, सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांनी सुट्या तेलाच्या विक्रीवर घातलेल्या बंदीच्या निर्णयावरूनही वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तेल काढणे आणि त्याची विक्री करणे हा अनेकांचा पारंपरिक व्यवसाय असल्याचे सांगत, या व्यवसायावर बंदी घातल्यास गप्प बसणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यामुळे एकीकडे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वडेट्टीवार यांची आक्रमक भूमिका, दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे आंदोलन आणि आता सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या दाव्यावरून निर्माण झालेला वाद, यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या घटक पक्षाच्या खासदार आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याकडून त्यांच्याबाबत करण्यात आलेला गंभीर दावा आणि त्यावर सुळे यांनी दिलेले आक्रमक प्रत्युत्तर यामुळे आघाडीतील अंतर्गत समन्वयाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वडेट्टीवार आपल्या दाव्यावर ठाम राहतात की त्याबाबत पुरावे सादर करतात, तसेच सुप्रिया सुळे यांनी मागितलेल्या पुराव्यांनंतर पुढील राजकीय भूमिका काय असते, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. या वादामुळे आगामी काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्यातील राजकीय संबंधांवरही चर्चा रंगण्याची शक्यता आहे.
___

error: Content is protected !!