व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Wadettiwar U Turn : सुप्रिया सुळे यांच्याबाबत आधी वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा, नंतर...

Wadettiwar U Turn : सुप्रिया सुळे यांच्याबाबत आधी वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा, नंतर घेतला यू-टर्न

supriya-sule-obc-certificate-claim-vijay-wadettiwar-u-turn-nagpur : ‘अनावधानाने नावाचा उल्लेख’ म्हणत वादावर पडदा

Nagpur: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या खळबळजनक दाव्याने राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले. सुळे यांच्याकडे ओबीसी समाजाचे जात प्रमाणपत्र असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी नागपुरात केला होता. मात्र, सुळे यांनी पुरावे सादर करण्याचे थेट आव्हान दिल्यानंतर वडेट्टीवार यांनी आपल्या वक्तव्यावर यू-टर्न घेत, सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख अनावधानाने झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे काही तासांतच रंगलेला हा राजकीय वाद आता तूर्तास निवळल्याचे चित्र आहे.

नागपुरात माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका मांडताना अर्ध्या मराठा नेत्यांनी ओबीसी समाजाचे जात प्रमाणपत्र काढून ठेवले असल्याचा दावा केला होता. यामध्ये सुप्रिया सुळे यांचाही समावेश असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले होते. “पक्की माहिती असल्याशिवाय मी बोलत नाही,” असे सांगत वडेट्टीवार यांनी सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील दोन प्रमुख घटक पक्षांमध्येच मतभेद निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली वडेट्टीवार यांच्या आरोपानंतर सुप्रिया सुळे यांनी तातडीने आक्रमक प्रतिक्रिया दिली. आपल्या कागदपत्रांची माहिती देत त्यांनी हा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला. “माझ्याकडे जन्म दाखला, पदवीचे प्रमाणपत्र, लग्नाचा दाखला आणि खासदारकीचे प्रमाणपत्र याशिवाय कोणतेही ओबीसी प्रमाणपत्र नाही,” असे सुळे यांनी स्पष्ट केले.

Vijay Wadettiwar : सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा वडेट्टीवारांचा सनसनाटी दावा

वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपाचे पुरावे सादर करावेत; अन्यथा जाहीर माफी मागावी, असे थेट आव्हान सुळे यांनी दिले. महाराष्ट्र काँग्रेसमधील नेते आपल्याला सातत्याने लक्ष्य का करत आहेत, याची तक्रार काँग्रेसच्या वरिष्ठ केंद्रीय नेतृत्वाकडे आणि राहुल गांधी यांच्याकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सुप्रिया सुळे यांनी थेट पुरावे मागितल्यानंतर वडेट्टीवार यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देत भूमिका मवाळ केली. सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख अनावधानाने झाला, असे सांगत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे सुरुवातीला अत्यंत गंभीर स्वरूप धारण केलेला हा वाद काही वेळातच वेगळ्या वळणावर गेला. वडेट्टीवार यांच्या या स्पष्टीकरणानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्यातील हा मुद्दा पुढे किती ताणला जातो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विजय वडेट्टीवार यांनी अलीकडच्या काळात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. नागपुरात ओबीसी समाजाचा मजातनिहाय जनगणना होत नसल्याच्या मुद्द्यावरही वडेट्टीवार यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारला घेरताना त्यांनी मराठा समाजातील नेत्यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर भाष्य केले.

Narhari Zirwal : ‘कशाला उपोषण करता, खाऊन-पिऊन आंदोलन करा’ मंत्री झिरवाळ यांचा सल्ला

मराठा समाजातील बहुतांश नेत्यांनी ओबीसी जातीचे प्रमाणपत्र काढून ठेवले असल्याचा दावा करत वडेट्टीवार यांनी “आता ओबीसींनाच खुल्या प्रवर्गात टाकण्याची वेळ आली,” असा टोला लगावला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा संवेदनशील मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आणि दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी वडेट्टीवार यांची आक्रमक भूमिका, यामुळे राज्यातील आरक्षणाचा राजकीय संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे.

सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा केल्यानंतर अवघ्या काही वेळातच वडेट्टीवार यांनी त्यांच्या नावाचा उल्लेख अनावधानाने झाल्याचे सांगितल्याने या प्रकरणाला यू-टर्न मिळाला आहे. मात्र, या संपूर्ण प्रकारामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील समन्वय, ओबीसी-मराठा आरक्षणाचा संघर्ष आणि काँग्रेस- राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे. वडेट्टीवार यांच्या स्पष्टीकरणानंतर सुळे या प्रकरणावर पुढे काय भूमिका घेतात आणि काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व या वादाची दखल घेते का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

__

error: Content is protected !!