nashik-crime-news-three-political-leaders-booked-same-day-mahapaur-gatnete-nagar-sevak : नाशिकच्या राजकारणात गुन्ह्यांची ‘हॅटट्रिक’; शहरात मोठी खळबळ
Nashik : शहरातील राजकीय वातावरण एकाच दिवशी घडलेल्या तीन वेगवेगळ्या गुन्हेप्रकरणांमुळे ढवळून निघाले आहे. शहरातील तीन दिग्गज राजकीय नेत्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून या घटनांनी नाशिकमधील राजकारणावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. माजी महापौर, विद्यमान गटनेते आणि माजी नगरसेवक अशा तीन वेगवेगळ्या स्तरांवरील नेत्यांचा या प्रकरणात समावेश असल्याने या घडामोडींचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत.
पहिल्या घटनेत नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडकर यांच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाणे येथे गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाशी संबंधित कार्यकर्ते योगेश दाभाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी मुर्तडकर यांच्याकडून उसने घेतलेले पैसे व्याजासह परत केले होते. मात्र तरीही त्यांनी त्यांच्या घरात घुसून कुटुंबीयांना शिवीगाळ करत मारहाण केली आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मानसिक छळाला कंटाळून दाभाडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे.
Vidhan parishad election : विधान परिषदेसाठी एकच जागा पण इच्छुकांची मात्र भाऊ गर्दी
दुसऱ्या घटनेत शिवसेना ठाकरे गटाचे महापालिका गटनेते केशव पोरजे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. एका माजी सैनिकाची सुमारे ९ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून या संदर्भात उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका लोकप्रतिनिधीवर अशा प्रकारचा आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
तिसऱ्या घटनेत माजी नगरसेवक शिवाजी चुंभळे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतजमिनीच्या वादातून संबंधित व्यक्तीवर हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांच्या विरोधात करण्यात आला आहे. पीडित व्यक्तीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेत तपास सुरू केला आहे.
Uddhav thackeray : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुनरागमन करणार का?
एकाच दिवशी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये तीन बड्या नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याने नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक पोलीस यांनी या तिन्ही प्रकरणांचा सखोल तपास सुरू केला असून संबंधित पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या घटनांमुळे नाशिकमधील राजकीय मुर्तडकर अधिकच तापले असून येत्या काळात या प्रकरणांमध्ये आणखी घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
___








